पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी व अन्य कारणांमुळे परीक्षा देता नाही, अशा विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेच्या तारखा जाहीर केले आहे. या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा दि. 5, 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने आज स्पष्ट केले.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन व ऑनलाइन परीक्षा दि. 12 ऑक्टोबरपासून सुरू आहेत. ऑनलाइन परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना लॉग-इन न होणे, इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, सर्व्हर डाऊन, आकृत्या व सूत्रे न दिसणे, पेपर सबमिट न होणे, चुकीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होणे, विद्यापीठाच्या दोन विषयाच्या परीक्षा एकाच वेळी असणे, विद्यार्थ्यास करोनाची बाधा इत्यादी तक्रारी विद्यापीठाकडे आल्या आहेत. त्यावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पुन्हा परीक्षा दि. 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत घेण्याचा निर्णय झाला.
फेरपरीक्षा ही ऑनलाइन पद्धतीनेच होतील. ज्यांची परीक्षा योग्यरीत्या व विना अडथळा झाली, अशा विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनद्वारे परीक्षा देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील, त्यांनी आपापल्या महाविद्यालयात अथवा जवळच्या महाविद्यालयात फेरपरीक्षा देण्यासाठी सुविधांचा वापर करून परीक्षा द्यावी, असेही परीक्षा विभागाने म्हटले आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या आहेत, अशाच विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा देणे अपेक्षित आहे. त्याबाबतचा तपशील दि. 2 नोव्हेंबरपर्यंत पाठवला जाईल. ज्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, परंतु ज्यांना फेरपरीक्षेसाठी इ-मेल प्राप्त झालेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी दि.3 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत विद्यापीठाच्या वेबपोर्टलवरील उपलब्ध असलेल्या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी.
-महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ