पुणे – लष्कर जलकेंद्राला पाणी पुरवठा करणारी पर्वती ते लष्कर जुनी जलवाहिनी पानमळा परिसरात फुटली. यामुळे शुक्रवारी शहराच्या पूर्व भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्याचा फटका सुमारे 6 ते 7 लाख पुणेकरांना बसला आहे.
सुमारे 1600 मिमी व्यासाची ही जलवाहिनी गुरूवारी दुपारी फुटली. त्यानंतर वर्दळ असल्याने महापालिकेने रात्री दहा वाजता जमिनीखाली फुटलेल्या जलवाहिनीचा शोध घेतला. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
शुक्रवारी पहाटे सहा वाजेपर्यंत हे काम सुरू होते. यानंतर लष्कर जलकेंद्राला पाणी पुरवठा करून शुक्रवारी दुपारनंतर या भागात कमी दाबाने पाणी सोडण्यात आले. ही जलवाहिनी फुटल्याने खराडी, चंदननगर, हडपसर, कोंढवा, मुंढवा, केशवनगर, वडगावशेरीचा काही भाग, महंमदवाडी, कोंढव्याचा काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. परिणामी अचानक पाणी न आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. त्यातच आता हा पाणी पुरवठा सुरळीत होण्यास दोन दिवस जाणार असून, महापालिकेने सोमवारी पुन्हा देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी पाणी बंद ठेवले आहे.
त्यामुळे, पुढच्या आठवड्याच्या सुरूवातीलाच या भागातील नागरिकांना पुन्हा पाणीसंकटाचा सामना करावा लागणार आहे