पुणे – पीएमपी प्रवाशांकडील मोबाइल संच लांबविणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दोन लाख 10 हजार रुपयांचे 12 मोबाइल संच जप्त करण्यात आले. या टोळीमध्ये छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील चोरटे आहे.
सतीश व्यंकटेश माधगोलू (22 ), जगदीश भास्करराव आवला (22 ), विक्रम शिवनाथ दास ( 22 रा. उपलपेटा, जि. हैद्राबाद, तेलंगणा), गणेश कृष्णा गौड (22 रा. छत्तीसगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडील मोबाइल संचलांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पुणे स्टेशन परिसरातील पीएमपी स्थानक परिसरात एका तरुणाच्या खिशातील मोबाइल संच चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी (5 ऑगस्ट) घडली होती. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा स्टेशन परिसरातील मालधक्का परिसरात चौघेजण थांबले असून ते मोबाइल विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अंमलदार मनोज भोकरे आणि शिवाजी सरक यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चौघांना पकडले.चौकशीत त्यांनी मोबाइल चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 12 मोबाइल संच जप्त करण्यात आले.
मुख्य हॅण्डलर परराज्यातून संभाळतो सूत्र…
ही टोळी, दिल्ली, मुंबई, हैद्राबाद अशा मोठ्या शहरांमध्ये कार्यरत आहे. ते एखाद्या शहरात गेले की दोन चार दिवसांत 50-60 मोबाईल चोरायचे. हे चोरलेले मोबाईल एका साथीदारामार्फत मुख्य हॅण्डलरकडे पाठवायचे. यानंतर लगेचच दुसऱ्या शहरात निघुन जायचे.
ते पुण्यात दोन ते तीन ऑगस्ट दरम्यान दाखल झाले होते. ते रेल्वे स्थानक परिसरातच रहात होते. तेथील मुख्य बस थांब्यावर गर्दी असलेल्या बसमध्ये ते चढायचे. यानंतर गर्दीतील एखादा प्रवाशी गाठून त्याच्या मागे पुढे गर्दी करत मोबाईल चोरायचे. मोबाईल चोरल्यावर पुढच्या बस थांब्यावर उतरुण निघुन जायचे.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त आर.एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, मोहन काळे, अनिल कुसाळकर, संजय वणवे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, तुळशीराम घडे आदींनी ही कारवाई केली.