नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याप्रमाणाचे आता मोदी सरकार आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप आपचे नेते संजयसिंह यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे, की बनावट केस उभी करून जशी राहुल गांधींची सदस्यत्वा घालवण्यात आली होती तशीच एक खोटी केस तयार करून गृहमंत्री अमित शहा हे राघव चढ्ढा यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मागे लागले आहेत. असे झाले तरी मी सभागृहात त्यांच्यावतीने लढेन असे त्यांनी नमूद केले.
दिल्ली सेवा विधेयक तपासणीसाठी सिलेक्ट कमिटीकडे पाठवावे असा प्रस्ताव राघव चढ्ढा यांनी तयार केला होता.त्या प्रस्तावावर काही खासदारांच्या सह्याही होत्या. पण चढ्ढा यांनी पाच खासदारांची संमती न घेताच त्यांची नावे या प्रस्तावात टाकली असा आरोप त्यांच्यावर केला जात असून त्या प्रकरणावरून चढ्ढा यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संजय सिंह यांनी सांगितले.
संपुर्ण भाजप राघव चढ्ढा यांच्या मागे लागली आहे असा आरोपही त्यांच्यासह अन्य आप नेत्यांनीही केला आहे. दरम्यान या पाच खासदारांच्या स्वाक्षऱ्यांबाबत आपल्याला राज्यसभेची नोटीस आल्यानंतर आपण त्याला उत्तर देऊ असे चढ्ढा यांनी म्हटले आहे.