हनीट्रॅपद्वारे टोळी जेरबंद ; तरुणीसह सहा जणांना ठोकल्या बेड्या

  • कोंढवा पोलिसांचे ऑपरेशन सेव्हनटी टू

पुणे- तिचे शिक्षण केवळ नववी पास..सोशल मिडीयाचा वापर करण्यात चांगलीच पटाईत..पती खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात, पतीच्या मित्रासोबत ओळख झाली. तो देखील गुन्हेगार..त्यातूनच त्यांनी हनीट्रॅपच्या माध्यमातून व्यवसायिक, तरुणांना जाळ्यात खेचण्यात सुरूवात केली.

अनेकजण त्यांचे सावज सुद्धा झाले. कोणी अब्रुला घाबरून तर कोणी भितीपोटी त्यांना पैसे देत पोलिसात जाण्याचे टाळले. मात्र चार दिवसापुर्वी मुंबईच्या एका व्यवसायिकाने पोलिसात जाण्याचे धाडस केले अन् अवघ्या 72 तासाच्या आत पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे आणि त्यांच्या पथकाने संपुर्ण हनीट्रॅप टोळीच गजाआड केली.

हनीट्रॅपच्या माध्यमातून पनवेल येथील व्यवसायिक नितीन दत्ता पवार (वय.31) यांना मारहाण करत खंडणी उकळणार्‍या सहा जणांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

रविंद्र भगवान बदर (वय.26,रा. इंदापूर),सचिन वासुदेव भातुलकर (रा. येवलेवाडी),आण्णा राजेंद्र साळुंके (वय.40,रा. गोकुळनगर कोंढवा),अमोल साहेबराव ढवळे (वय.32,रा.बाणेर मुळ सोलापूर माढा), मंथन शिवाजी पवार (वय.24,रा. इंदापूर), आणि 19 वर्षीय तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

टोळीतील 19 वर्षीय तरुणीने इन्स्टाग्रॅमच्या माध्यमातून व्यवसायिक नितीन पवार यांच्यासोबत ओळख निर्माण केली. त्यातूनच मैत्री करत त्यांना तरुणीने जाळ्यात खेचले.

रविवारी तिने व्यवसायिकाला भेटण्यासाठी कोंढवा येथील येवलेवाडी परिसरात बोलाविले होते. त्यावेळी आरोपी तरुणीने त्यांच्या अंगाशी झटून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

त्यानंतर व्यवसायिक हा त्यांच्याकडील चारचाकी गाडीत बसून तरुणीसोबत निघाले होते. दरम्यान अचानक तिघा अनोळखी व्यक्तींनी गाडी अड़वून गाडीत बसून त्यांना मारहाण केली. तसेच इन्स्टाग्रामवरील महिलेसोबत बलात्कार केला असल्याची पोलिसात खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली.

जर पैसे दिले नाही तर संबंधीत आरोपी महिलेसोबत त्यांना लग्न करावे लागेल असे कागदावर लेखी घेतले. त्यावर व्यवसायिकाची सही व हाताचा अंगठा देखील घेतला. त्यानंतर व्यवसायिकाकडे 50 लाखाच्या खंडणीची मागणी केली. यावेळी व्यवसायिकाच्या खिशातील 50 हजाराची रोकड व त्यांच्या जवळील एटीएम कार्डद्वारे 30 हजार असे 70 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

पाच लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर आरोपी व्यवसायिकाला सतत फोन करत होते. शेवटी त्यांनी कोंढवा पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. तांत्रिकविश्लेषनाद्वारे पोलिसांनी माग काठून आरोपींना बोपदेव घाट गारवा हॉटेल येथून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

अटक टोळीतील रविंद्र बदर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तरुणीच्या पतीसोबत त्याची मैत्री होती. त्यातूनच त्याने संबंधीत तरुणी व तिच्या भावाला एकत्र करून येवलेवाडी परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तेथून तो ही हनीट्रॅप टोळी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे कर्मचारी योगेश कुंभार, गणेश चिंचकर,महेश राठोड, अभिजित रत्नपारखी यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.