गणेशोत्सवाला टिळकांच्या स्वप्नातील स्वरूप

पुणेकरांनी दैनिक “प्रभात’कडे व्यक्त केल्या भावना


शहरात सामाजिक समरसता वाढवणारा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा उत्सव 

पुणे – पुणे आणि गणेशोत्सव हे जगप्रसिद्ध समीकरण असून, शहरातील गणेशोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. लाखो भाविक, भव्य मिरवणुका, सजावटी, विद्युत रोषणाई, “डीजे’च्या भिंती असे चित्र दरवर्षी पाहायला मिळते. मात्र, यंदा शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला. घरगुती गणेशोत्सवदेखील पर्यावरणपूरक आणि साधेपणाने होत आहे. 

पुण्यातील गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा असून, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते म्हटले जाते. सन 1920 साली लोकमान्य टिळकांचे निधन झाले.
यंदाचे सन 2020 हे वर्ष टिळकांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्याकाळी सामाजिक समरसतेच्या दृष्टीकोनातून गणेशोत्सवाचा प्रारंभ झाला. यंदादेखील करोनाच्या पार्श्‍वभूमीवर दणदणाट टाळत नागरिक, गणेशोत्सव मंडळे सामाजिक भान राखत समाजोपयोगी निर्णय घेत आहे. त्यामुळे टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शांततेत, साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजे टिळकांना वाहिलेली आदरांजली असल्याची भावना पुणेकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बदलत्या काळानुसार आपले सण आणि उत्सवदेखील बदलत आहेत, शिवाय हे लोकमान्य टिळकांचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. टिळकांनी त्या काळात गणेशोत्सवाचा आधार घेत सामुहिक एकात्मता जपत स्वातंत्र्याचा विचार जनमानसात रोवला. आज तब्बल 100 वर्षांनंतर आरोग्यविषयक जागरूकतेसाठी अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत आहे. दोन्हींचे प्रयोजन वेगळे असले, तरी त्यात समाजहित जपण्याची भावना मात्र समान आहे.
– प्रज्ज्वल खेडकर


आजही पुण्यात उत्सव का आणि कसे घेतले जावेत याबाबतचे भान प्रतिष्ठित मंडळांसह बहुसंख्य जनतेला असल्याने योग्यवेळी, योग्य निर्णय घेत यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. डीजेच्या भितींनी काही अंशी कलंकित झालेला उत्सव नेहमी कलंकित दाखवला जातो. मात्र, आजही पुण्यात सामाजिक भान आहे, हे यावर्षी पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मोजक्‍या लोकांमुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य भंग होत नाही, टिळकांच्या मनातील सामाजिक समरसता वाढवणारा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा गणेशोत्सव साजरा होतो. मात्र यावेळी पुणेकरांनी सामाजिक भान असल्याची रेषा आणखी पुढे नेली आहे. यामुळे येणाऱ्या पिढीला एक नवा आदर्श घालून दिला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
– महेश आकोलकर


समाजाने एकत्र यावे आणि समाजोन्नतीसाठी काम करावे, असे लोकमान्य टिळकांना अपेक्षित होते. मागील काही वर्षांत गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. आधुनिकीकरणामुळे स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे टिळकांना अपेक्षित असणाऱ्या गणेशोत्सवाचा मूळ गाभा लोप पावत होता. पण करोनामुळे आज नागरिक सामाजिक भान बाळगून प्रत्येक निर्णय घेत आहेत. यंदाचा गणेशोत्सवदेखील अशाच प्रकारचे सामाजिक भान बाळगून सर्वजण साजरा करत आहेत, ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे टिळकांना अपेक्षित असणारा गणेशोत्सव एकत्रित येऊन साजरा करायला जरी जमला नसला, तरी त्यांना अपेक्षित असणारा सामाजिक उन्नतीचा आणि भान असणारा गणेशोत्सव यंदा साजरा होत आहे.
– संतोष कसबे


लोकमान्य टिळकांनी समाजाला एकप्रकारे जागे करण्यासाठी उत्सव सुरू केला होता. मधल्या काळात त्याचे रूप बदलले. वाटेल ती आणि वाटेल तशी मौजमजा करण्यासाठी तरुणाई बाहेर पडू लागली होती. करोनामुळे यंदा सगळ्याला खीळ बसली. परंतु, टिळकांच्या स्वप्नातील उत्सवाचे स्वरूप यावर्षी पाहायला मिळत आहे. वर्गणी, डी.जे, कोणताही धिंगाणा यंदा नाही. यावर्षी त्यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानमाला, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन करण्यात येत आहे. टिळकांना अपेक्षित असणाऱ्या अनेक गोष्टी लोकसहभागाने, शांतपणे होत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. मिरवणूक, ढोल-ताशांच्या वादनामुळे यंदा आनंद मिळणार नसल्याचीदेखील हूरहूर आहे.
– विठ्ठल जोशी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.