सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो
कोल्हापूर : सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो ही आशा व्यक्त करताना गणेश उत्सवात गणेश मंडळांच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानासारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील शुभेच्छा संदेशात म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा आज देशभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करुन साजरा होत आहे. ज्यांच्या असिम त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, देशभक्तांच्या, क्रांतीकारकांच्या आणि शहिदांच्या प्रती मी प्रथम आदर व्यक्त करतो. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.
आपल्या सर्वांना आनंद देणारा गणेशोत्सव पुढील आठवड्यात साजरा होणार आहे. आपण सर्वांनी उत्साहाने गणेशोत्सव साजरा करावा. पण सोशल डिस्टंसिंग तसेच स्वत:च्या आणि कुटूंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवात प्लाझमा दान सारखे उपक्रम राबवून कोरोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी सहकार्य करावे. मोहरमच्या उत्सवात सुध्दा सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
प्लाझ्मा थेरेपीने 25 अत्यवस्थांना जीवदान….
कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोगही जिल्ह्यात यशस्वी झाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, 60 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. यामुळे 25 अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यासाठी सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन, आयजीएम हॉस्पीटल या कोरोना हॉस्पीटलांबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पीटलांनीही रुग्णसेवेसाठी योगदान दिले आहे.
आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती तुम्हा आम्हा सर्वांनाच नितांत आदर आहे. जिल्हयातील शहीद जवानांच्या तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या प्रती सर्वांनीच उतराई होणे अगत्याचे आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती तुम्हा-आम्हा सर्वांना मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो, ही आशा व्यक्त करतानाच कोव्हिड -19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांना त्यांनी आदरांजली वाहिली. सायकलींगमध्ये गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करणाऱ्या अथर्व गोंधळी याचा यावेळी सत्कार करण्यात आला.