करोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेला हा गणेशोत्सव देखील आदर्श करू – हेमंत रासने

कोरोनाचे विघ्न गणपतीबाप्पा नक्कीच दूर करणार


पुणे – येणारा गणेशोत्सव करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आला आहे. गेले अनेक वर्षे आपण गणेशोत्सव साजरा करत आहोत. परंतु हा गणेशोत्सव आचारसंहितेत पार करणे अनिवार्य झाले आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगला खूप महत्त्व आहे, मास्क वापरणे गरजेचे आहे, असे आवाहन महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केले आहे.

पुण्याचा गणेशोत्सव गर्दीचा असतो. शहरात भारतातून नव्हे तर जगातून अनेक लोक आकर्षित होतात. मात्र यावेळचा गणेशोत्सव आपल्याला काही निर्बंधामध्ये पार पाडावा लागत आहे. त्यासाठी आपण आपल्या स्वत:साठी काळजी घ्यायची गरज आहे. घरचा गणेशोत्सव पूर्ण पर्यावरणपूरक असावा अशी आग्रहाची विनंती गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला करत असल्याचे रासने म्हणाले.

त्यासाठी आपण घरची मूर्ती शक्‍य तितकी छोटी आणावी. त्याची यथासांग धार्मिक उपचार नेहमीच्या पद्धतीने करावेत. आपल्यावरचे हे आलेले विघ्न गणपतीबाप्पा नक्कीच दूर करणार आहे. परंतु आपला दीड दिवसाचा गणपती असो, पाच, सात किंवा दहा दिवसांचा गणपती असो त्याचे विसर्जन आपण घरातच करावे. विसर्जनानंतर त्याची माती आपण घरातील रोपट्यांना, कुंड्यांमध्ये टाकावे. बाप्पाच्या आशीर्वादाने त्यातून आपल्याला चांगली फळे, फुले मिळतील, असे रासने यांनी नमूद केले.

गणेशोत्सवाचा पंचवीस-तीस वर्षांचा कार्यकर्ता असल्याचे सांगून रासने यांनी सार्वजनिक गणपती मंडळांना आवाहन केले आहे की, यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळानेही उत्सव साजरा करताना अनेक निर्बंध घालून घेतले आहेत. प्रतिष्ठापना आणि विसर्जनाची मिरवणूक आम्ही करणार नाहीत. आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन ऑनलाइन उपलब्ध करून देणार आहोत, अभिषेकही ऑनलाइन करणार आहोत. त्या ठिकाणी गर्दी टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आपणही तसेच करण्याचा प्रयत्न करावा.

पुणे शहरातील गणेशोत्सव हा नेहमीप्रमाणे आदर्श असतो. परंतु चला आता सारे मिळून करोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेला हा गणेशोत्सव देखील आदर्श करू, एवढे आवाहन करतो. यावर्षी आलेले हे करोनाचे विघ्न गणपती बाप्पा दूर करेल असा आशावाद व्यक्त करतो असे रासने यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.