नेवासा – नेवासा नगरपंचायतीमधील वृक्षलागवड घोटाळाप्रकरणी कॉंग्रेसने मुख्याधिकाऱ्यांना झाडांची रोपे भेट देत गांधीगिरी आंदोलन केले. नेवासा नगरपंचायतीकडून चौदाव्या वित्त आयोगामधून शहरात पन्नास लाखांची दोन हजार वृक्ष लागवडीची निविदा काढण्यात आली होती. हे काम ड्रॅगनफ्लाय नर्सरीला देण्यात आले होते. परंतु निविदेनुसार ठेकेदाराने वृक्षलागवड केली तर नाहीच परंतु लावण्यात आलेल्या वृक्षाकडे डोकूनही पाहिले नाही.
वृक्षलागवडीच्या नावाखाली नगरपंचायत अधिकाऱ्यांना हाताशी धरून तब्बल अठ्ठावीस लाखाची बिले देखील काढली. शहरात दोन हजारपैकी शंभर देखील वृक्ष जीवंत असल्याचे दिसत नाही. कॉंग्रेसने याविषयी आक्रमक भूमिका घेत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
तसेच ठेकेदार व यात सामील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र अद्यापही हा अहवाल न दिल्याने गांधीगिरी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, संदीप मोटे, सुदाम कदम, शोभा पातारे, मुसा बागवान, रंजन जाधव, अंजुम पटेल, सतीश तऱ्हाळ, द्वारकनाथ जाधव, किरण साठे, संजय होडगर आदी उपस्थित होते.