गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने गावे दुमदुमली

पुणे – “गणपती बाप्पा मोरया’चा गगनभेदी जयघोष, जिल्ह्यात कुठेतरी वरुणराजाने अधूनमधून दिलेली सलामी, ढोल-ताशांचा दणदणाट, फुलांची उधळण आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीत सोमवारी (दि. 2) गणरायांचे आगमन झाले. रविवारी (दि.1) सायंकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाची धामधुम जिल्ह्यात सर्वत्र सुरू होती. त्यामुळे सांस्कृतीक, शैक्षणिक, ऐतिहासिक जिल्ह्यात भक्ती-शक्तीचा संगम दिसून येत होता. लहान-थोरांनी मोठ्या भक्‍तिभावाने बाप्पाची प्रतिष्ठापना केली.

जिल्ह्यातील जवळपास सर्वच मुख्य रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. तर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता. सर्वच गणेश मंडळांनी मिरवणुका काढून वाजतगाजत गणपती आणले. सार्वजनिक मंडळांच्या मंडपांइतकाच उत्साह घराघरांमध्ये पाहायला मिळाला. घराघरांमध्ये प्राणप्रतिष्ठापनेची लगबग सुरू होती. आरती, स्तोत्र आणि मंत्रपठण असे मंगलदायक वातावरण प्रत्येक घरात पाहायला मिळाले.

…अन्‌ बाप्पा सोशल मीडियावर झळकले
बाप्पा घरी येणार म्हणून बच्चे कंपनी आनंदाने हरखून गेली होती. कोठे बाप्पाची पहिली छबी टिपण्याची तर कोठे बाप्पासोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली होती. बाप्पासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर धडकू लागले आहेत.

मुहूर्त साधण्याची लगबग
महाउत्सव असलेल्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सकाळपासूनच बाप्पाला घेऊन जाण्यासाठी नागरिक व मंडळांची लगबग सुरू होती. जिकडे-तिकडे पारंपरिक वेषातील अनवाणी पावलांची लगबग दिसत होती. नातवंडांसोबत आजी-आजोबांचा उत्साहही ओसंडून वाहत होता. बाप्पाची मूर्ती हातात येताच “मोरया’चा गजर टीपेला पोहोचत होता. कुणी पाटावरून, कुणी डोक्‍यावरून, कुणी दुचाकीवर, कुणी रिक्षाने तर कुणी स्वत:च्या खासगी वाहनांनी बाप्पांना घरी आणले. तर दुपारी दीडपर्यंतच मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर बाप्पांना विराजामान करण्याकडे अनेक नागरिकांचा कल दिसून आला.

Leave A Reply

Your email address will not be published.