नेतेमंडळी नौकाविहारासाठी आली होती का?

नीरा नरसिंहपूरच्या पूरग्रस्तांचा सवाल

नीरा नरसिंहपूर – नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) परिसरातील नागरिकांना त्यांच्या नुकसान भरपाईचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. येथील ग्रामस्थ आता कुठे तरी पूरग्रस्त परिस्थितीतून स्वत:ला सावरत आहेत. पुरामुळे अनेक नागरिकांचे आर्थिक आणि स्थावर नुकसान झाले आहे. नीरा नरसिंहपूर परिसरातील ग्रामस्थ आजही सरकारी मदतीपासून वंचित असून मदतीचे आश्‍वासन दिलेली नेतेमंडळी आणि सरकारी अधिकारी पुराच्या पाण्यात नौकाविहारासाठी आले होते का? असा सवाल केला जात आहे.

नीरा नदीत दीड लाख क्‍युसेकने पाणी सोडल्याने नीरा-भीमा नद्यांना महापूर आला होता. यामध्ये निरा नदीकाठी असणाऱ्या कळंब, खोरोची, नीरनिमगांव, पिठेवाडी, भगतवाडी, नीरा नरसिंहपूर या परिसरातील घरात पुराचे पाणी शिरले होते. येथील पुरस्थितीची पाहणी नौकेत येवून हर्षवर्धन पाटील, आमदार दत्रात्तय भरणे, तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्यासह अन्य पदाधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांनी केली होती. त्यावेळी येथील पुरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे पाणी कमी झाल्यानंतर तातडीने करण्यात येतील तसेच त्यांना नुकसान भरपाईतून त्यांना आर्थिक मदतही केली जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, एक महिन्यानंतरही येथील पूरग्रस्तांना मदत मिळत नसल्याने शासकीय यंत्रणेबाबत संबंधित गावच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

नीरा नरसिंहपूर गावात पुराचे पाणी शिरल्याने संगम स्थानावर सर्व घाट जानुबाईचे मंदिर कवडेघाट, लक्ष्मी घाट, माणकेश्‍वर घाट पाण्याखाली गेले होते. मंदिराच्या जवळील सर्व घरांतील सामान मंदिरात नेण्यात आले होते. काही कुटुंबांचे स्थांलातर चैतन्य मंदिरात तर काही कुंटुंबाचे स्थांलातर येथील विविध मंदिरात करण्यात आले होते. यात मंदिर परिसर तसेच घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना हवे ते सहकार्य शासनाकडून देण्यांची ग्वाही तहसीलदार सोनाली मेटकरी यांनीही दिली होती. यासह येथे आलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यानेही मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते.

आता, नदीचे पाणी कमी झाले असून गावतील दैनंदिन जनजीवनही सुरळीत झाले आहे, अशा स्थितीत नुकसानीचे पंचनामे होऊन सरकारकडून तातडीने मदत मिळणे अपेक्षित आहे. परंतु, याच कामाला कमालीचा उशीर होत असून ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. पूरग्रस्त नागरिकांना शासनानाकडुन निकृष्ट दर्जाचा गहू व तांदुळ यांचे वाटप करण्यात आले. रॉकेलसाठाही पूरग्रस्तासाठी आला होता. परंतु, धनदांडग्या लोकांनीच तो हडप केला, असा आरोपही पूरग्रस्त नागरिकांनी केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)