पाच जणांसह चोरीचा ऐवज घेणारी गुजरातची महिला गजाआड ः चाकण पोलिसांची कारवाई
चाकण-जानेवारी महिन्यात झालेल्या घरफोडीचा चाकण पोलिसांनी तपास लावत पाच चोरट्यांसह हे दागिने विकत घेणाऱ्या अहमदाबादच्या महिलेला ताब्यात घेतले आहे.
कपिल मनोरीया राजपूत (वय 35, रा. निमगाव दावडी, ता. खेड), जितु बारीसाब राजपुत (वय 24, रा. बहुळ, ता. खेड), मच्छिंद्र पोपट राठोड (वय 26, रा. आंबी, ता. मावळ), वामन नंदु राठोड (वय 27, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर), संदिप नटवर राठोड (वय 25, रा. रांजणगाव गणपती) व आशा राजुभाई ठक्कर (रा. अहमदाबाद, गुजरात) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जानेवारीच्या रात्री चाकण बाजारपेठेतील भांबुर्डेकर सराफाचे दुकान चोरट्यांनी फोडून या दुकानातून 36 लाख 25हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने घरफोडी चोरी करून चोरून नेले होते. त्याबाबत चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याची चाकण पोलिसांनी शिताफीने तपास करत उकल केली. पोलीस उपनिरीक्षक पासलकर, हवालदार हिंगे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने वरील पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपींकडे केलेल्या तपासात आरोपींनी या गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल हा आशा राजुभाई ठक्कर (रा. अहमदाबाद, गुजरात) हिस विक्री केला असल्याचे सांगितले. चोरीचा माल घेणाऱ्या ठक्कर या महिलेला अहमदाबाद गुजरात येथे शोध घेऊन तिलाही या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून तिच्याकडून या गुन्ह्यातील 20 किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या आरोपींनी अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा सराफाचे दुकान फोडले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे, पोलीस उप निरीक्षक विक्रम पासलकर, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, हवालदार सुरेश हिंगे, शिवानंद स्वामी, बापु सोनवणे, निखिल वरपे, हनुमंत कांबळे, गायकवाड, राळे, हाडवळे, काकडे, झेंडे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकम पासलकर हे करीत आहेत.