नागपूर – लोकसभेच्या प्रक्षेक गॅलरीत बसलेल्यापैकी दोन तरुणांनी खासदार बसलेल्या सभागृहात उडी मारली आणि स्मोक कँडल फेकले. या घटनेनंतर विधान भवनातील गॅलरी पास तातडीने बंद करण्यात आले असून परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
नागपुरातील विधानसभा आणि विधान परिषदेतील प्रक्षेक गॅलरीच्या जवळ पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच विधानसभा आणि विधान परिषदेत सुरक्षा पासेस बंद करण्यात आल्यानंतर आता ज्यांच्याकडे पासेस आहेत, त्या प्रत्येक व्यक्तींकडे ओळखीचा पुरावा मागण्यात येत आहे.
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांनी बंदोबस्तात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विधान भवनात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार येण्यापूर्वी नियमाप्रमाणे सुरक्षेची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.