गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई : लाखांचा ऐवज पळवला
तळेगाव ढमढेरे -दहा दिवसांपूर्वी सातकरवाडी येथे मुलगा शेतात गेला आणि घरावर दरोडा टाकून गंभीर जखमी करून टाकणारे अट्टल दोन दरोडेखोरांना पकडून मुसक्या आवळल्या असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
मानसुक उर्फ निगऱ्या अर्पण भोसले (वय 30, रा. पारनेर जि. नगर), किरण म्हस्के (वय 25, रा. सांगवी सूर्या, ता. पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी सातकरवाडी (ता. शिरूर) येथे टाकलेल्या दरोड्यात महिलेला मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यांच्या घरातील दागिने व रोकड, मोबाईल तसेच शेजारी कैलास कोकरे यांचा वाय-फाय मोडियम असे एकूण 1 लाख 68 हजारांचा ऐवज चोरून नेला होता.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी गुन्ह्याची उकल करण्यासाठी सूचना गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना दिल्या होत्या. गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या मागावर होते. यातील काही आरोपी हे पारनेर परिसरात राहणारे असून रांजणगाव परिसरामध्ये येणार आहेत, अशी माहिती मिळाली.
त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धनवट यांनी अधिकाऱ्यांना रवाना केले. रांजणगाव परिसरात हे दोघे आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पळाले. पोलिसांनी 3 ते 4 किलोमीटर पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी दरोडा टाकल्याची कबुली दिली.
जखमी महिलेचा डोळा निकामीच
दरोड्यातील चोरट्यांनी महिलेला जबर मारहाण केली होती. यात पार्वतीबाई सातकर यांच्या डोळ्याला गंभीर जखम झाल्याने त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून डोळा काढावा लागला आहे. त्यामुळे चोर पकडले; मात्र महिलेचा डोळा कायमस्वरूपी निकामी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.