पुणे – ऑलिम्पिक पदक विजेते तयार करण्याच्या ध्येयाअंतर्गत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते नेमबाज पद्मश्री गगन नारंग यांच्या गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाऊंडेशन (जीएनएसपीएफ) आणि बंदूक उत्पादन क्षेत्रात जागतिक पातळीवर नावाजलेली वॉल्थर यांनी पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कोटा प्राप्त भारतीय नेमबाजांना आपला पाठिंबा जाहीर केला.
वॉल्थरने जीएनएसपीएफ सोबत आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात सहभागी होणारे रुद्रांक्ष पाटील आणि मेहुली घोष तसेच पॅरालिम्पिक कोटामध्ये समावेश होण्याची दाट शक्यता असलेले स्वरूप उन्हाळकर यांना अत्याधुनिक अर्थात हाय-एंड रायफल भेट स्वरूपात देण्यात आली.
एका रायफलीची किंमत ही ३.७५ लाख रुपये इतकी आहे. जीएनएसपीएफच्या ऑलिम्पिक खेळांसाठी क्रीडापटूंना पाठिंबा देण्याच्या प्रमुख उद्देशाने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षांपासून जीएनएसपीएफला पाठिंबा देणाऱ्या वॉल्थरने पुन्हा एकदा याद्वारे फाउंडेशनच्या उपक्रमावर विश्वास दाखवला आहे.