नवी दिल्ली – फ्युचर रिटेल कंपनीने अमेझॉन कंपनीसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेला दावा न्यायालयाने फेटाळला आहे.
फ्युचर रिटेल कंपनीने रिलायन्स रिटेलला 24 हजार 713 कोटी रुपयांची मालमत्ता विकली आहे. या व्यवहाराला ऍमेझॉन कंपनीने आंतरराष्ट्रीय लवादात आव्हान दिल्यानंतर लवादाने ऍमेझॉनच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. त्यानंतर ऍमेझॉनने पुढील प्रक्रिया करू नये अशी याचिका फ्यूचर रिटेलने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.
न्यायालयाने सांगितले की, यासंदर्भातील निर्णय स्पर्धा आयोग, शेअर बाजार नियंत्रक सेबी इत्यादींनी घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेला निर्णय स्थगित करण्याची गरज नाही. न्यायालयाच्या निर्णयाचे अमेझॉन कंपनीने स्वागत केले असून फ्युचर रिटेल कंपनीने आम्ही निर्णयाचा अभ्यास करीत असल्याचे सांगितले आहे. कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही पुढील उपाययोजना ठरवू असे फ्युचर रिटेल कंपनीने सांगितले.