भवानीनगर – उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अपशब्द काढले. त्यानंतर राज्यभरात पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून ( NCP) निषेध आंदोलने केली जात आहे. इंदापूर तालुक्याच्या वतीने भवानीनगर (Bhawani Nagar) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको करून जाहीर निषेध करण्यात आला.
निरा डाव्या कालव्यावरील पुलाजवळ इंदापूर-बारामती रस्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकृतीची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेसमोर कुत्र्याने शिकाई धरल्याने उपस्थितांचे या घटनेने लक्ष वेधून घेतले.
यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जेवढी राजकीय कारकीर्द आहे, तेवढे वय पडळकरांचे आहे. त्यामुळे पडळकर यांनी एवढ्या महान व्यक्तीबद्दल आपले बेताल वक्तव्य करणे उचित नाही. तसेच खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील खालच्या पातळीमध्ये अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन भवानीनगर सणसर या ठिकाणी इरिगेशन बंगला येथील पुलावरती पडळकर यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. डाव्या कालव्यामध्ये पडळकर यांच्या प्रतीकृती पुतळ्याचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पाडळकर यांच्या विरोधात मोठ्या घोषणा देत निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ, जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका युवक अध्यक्ष एडवोकेट शुभम निंबाळकर, उपाध्यक्ष योगेश डोंबाळे, सरपंच अजित नरुटे, छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी पाटील, भाऊसाहेब सपकळ, वसंत जगताप, यशवंत नरुटे, दिलीप पांढरे, शब्बीरभाई काझी, हमीद तांबोळी, अजय सोनवणे, तुषार सपकळ, शशी निंबाळकर, रोहित निंबाळकर, तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर –
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही उल्लेख केला. पण अजित पवारांचा उल्लेख त्यामध्ये नव्हता. त्यावर प्रश्न विचारल्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले की, “आम्ही अजित पवारांना मानत नाही. अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यामुळे मी त्यांना पत्र लिहायचा विषय नाही. ते आता जरी आमच्यासोबत आले असले तरी त्यांची भूमिका वेगळी आहे. आम्ही अजित पवारांना उपमुख्यमंत्री मानत नाही.”
आमदार गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.