गरज 18 कोटींची : मदतीसाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन
पिंपरी – भोसरीतील आठ महिन्यांच्या वेदिका शिंदे या चिमुकलीवरील वैद्यकीय उपचारांकरिता 16 ते 18 कोटी खर्च येणार आहे. या चिमुकलीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला चऱ्होली, मोरयानगरमधील नागरिकांनी प्रतिसाद देत एका दिवसात 11 हजार रुपयांचा मदत निधी एकत्रित करुन नगरसेविका विनया तापकीर यांच्याकडे सुपूर्द केला.
वेदिका शिंदे या चिमुकलीला दुर्मिळ आजार असून, तिच्यावरील उपचारांकरिता आवश्यक असलेले इंजेक्शन खरेदीचा खर्च 16 ते 18 कोटी एवढा आहे. वेदिकाच्या पालकांना हा खर्च पेलणे शक्य नसल्याने त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.त्याकरिता अनेक स्वयंसेवी संस्था व संघटना सरसावल्या आहेत.
शहरात क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. याशिवाय समाजातील दानशूर व्यक्तींनादेखील आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार नगरसेविका विनया तापकीर यांनी चऱ्होलीतलि मोरयानगर परिसरातील नागरिकांना निधी संकलनाचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक व व्यावसायिकांनी अकरा हजार रुपये निधी संकलित केला. हा निधी विनया तापकीर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.