जामखेड (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेल्या चोंडी येथे पर्यटन वाढावे यासाठी आमदार रोहित पवार सतत प्रयत्न करत होते. त्यातच त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.
अहिल्यादेवींच्या मंदिरा शेजारून सीना नदी वाहते, आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून मागच्या वर्षी सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. त्यामुळे सीना नदीच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्नशील होते. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत 4 कोटी 13 लाख रुपयांचा निधी चोंडीसाठी मंजूर करण्यात आला आहे. पर्यटन विकासानंतर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही या ठिकाणी होईल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
“आधीच्या लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील अनेक मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, काही गोष्टींचं फक्त त्यांनी राजकारण केलं. लोकांचं हित लक्षात घेऊन परिसरातील विविध विकासकामांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे. त्यासोबतच चोंडीपर्यंत जाणारा मुख्य मार्ग आता राज्य महामार्ग करण्यात आला असून त्यालासुद्धा भरघोस निधी माझ्या माध्यमातून देण्यात आला आहे.
– रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ)
अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा व त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला पर्यटनाच्या माध्यमातून होईल या उद्देशाने आमदार रोहित पवारांनी विशेष लक्ष घालून विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. सध्या सीना नदीचे खोलीकरण केल्यानंतर पर्यटन काही प्रमाणात वाढले आहेत. तसेच चोंडी येथे विविध भागातून नागरिक येण्यास सुरुवात झाली आहे. आता आणखी निधी मंजूर झाल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा फायदा होईल, हे मात्र नक्की. आमदार रोहित पवार मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर करून आणत असल्याने मतदारसंघातील नागरिकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.