“पूर्णवेळ’ कानाडोळा! सहायक प्राध्यापकांच्या भरतीचे भिजत घोंगडे कायम

उमेदवारांनी केलेली आंदोलने प्रस्तावातच अडकली
“सीएचबी’ तत्त्वावरील
सहायक प्राध्यापक भरतीचाच धडाका


पुणे –
गेल्या काही वर्षांपासून कारणे व अडथळ्यांमुळे वरिष्ठ महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक भरतीचे भिजत घोंगडे पडले आहे. पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांच्या भरतीला शासनाने ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी पर्यायी व्यवस्था म्हणून तासिका तत्वावर (सीएचबी-क्‍लॉक अवर बेसिस) सहायक प्राध्यापकांच्या नियुक्‍त्या करण्याचा धडाका लावला आहे. पुणे विभागात 75 महाविद्यालयांत तब्बल 2 हजार 54 जणांच्या तासिका तत्वावर नेमणुका केल्याचे समोर आले आहे.

राज्यात विविध विभागात सहायक प्राध्यापकांची 40 टक्के रिक्त पदे भरण्यास शासनाकडून दोन वर्षांपूर्वीच मान्यता देण्यात आली होती. मात्र अद्यापही ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. करोनाच्या संकटामुळे शासनाने आर्थिक काटकसरीचे कारण पुढे करून विविध विभागातील नवीन भरतीला बंदी घातली आहे. त्याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले होते. सहायक प्राध्यापकांची 100 टक्‍के रिक्‍त पदे भरावीत यासाठी उमेदवारांकडून सतत आंदोलन करण्यात येत आहेत. उच्च शिक्षण विभागाकडून त्याची दखल घेत प्रस्ताव तयार करुन तो वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला आहे. त्यावर अद्याप काही ठोस निर्णय झालेला नाही.

पुणे विभागात पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यांतील विद्यापीठ, महाविद्यालयांचा समावेश होतो. यातील बहुसंख्य अनुदानित महाविद्यालयांनी पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे तासिका तत्वावर सहायक प्राध्यापकांची भरती करण्यास “एनओसी’ मिळावी यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. दाखल झालेल्या सर्व प्रस्तावांची तपासणी करुन नियमाप्रमाणे त्यांना मान्यताही देण्यात आलेली आहे. यात तासिका तत्वावर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पदे भरण्यात आलेली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.