पुणे – राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांतील शिक्षण संचालकांची पाच पदे रिक्त आहेत. अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्यांद्वारे ती भरण्यासाठी हालचाली सुरू असून पुढील महिन्यात नव्या संचालकांच्या नियुक्त्या होणार आहे. या नियुक्त्या झाल्यानंतरच शिक्षण विभागाच्या कामकाजाला गती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांना ठराविक मुदतीत पदोन्नत्या दिल्या जात नसल्याने शिक्षण विभागातील बरीचशी महत्त्वाची पदे काही वर्षांपासून रिक्त आहे. या पदांचा अतिरिक्त कार्यभार कोणत्या ना अधिकाऱ्यांच्या माथी मारून कामकाज रेटण्यालाच प्राधान्य दिले जाते. मात्र, यामुळे कार्यालयातील विविध प्रकरणे मार्गी लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे ती प्रलंबित राहत आहेत. सध्या केवळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, बालभारतीचे संचालक दिनकर पाटील हे दोन पूर्णवेळ संचालक कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्याकडेही इतर विभागांचा अतिरिक्त कार्यभार आहे. दरम्यान, शिक्षण आयुक्तालयाने गेल्या महिन्यात पाच अधिकाऱ्यांच्या संचालक पदांच्या पदोन्नत्यांसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल (सीआर) जमा करण्याचे कामही वेगाने सध्या सुरू आहे. नागरी सेवा मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नियुक्त्यांचा पुढील मार्गही मोकळा होणार आहे.
पदोन्नत्यांबाबत उत्सुकता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी शरद गोसावी, विद्या प्राधिकरणाच्या संचालकपदी दिनकर टेमकर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी कृष्णकांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. प्राथमिक शिक्षण संचालक पदाचे वेतन उच्च न्यायालयाने गेल्या दहा महिन्यांपासून थांबविले आहे. त्यामुळे या प्राथमिक शिक्षण संचालक पदावर तुर्तास पूर्णवेळ कोणाचीही नियुक्ती होण्याची शक्यता धुसर झालेली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हा महेश पालकर किंवा दिनकर टेमकर यांच्याकडे सोपविला जावू शकतो.
काही प्रकरणांच्या विभागीय चौकशा अद्यापही सुरू असल्याने तुकाराम सुपे यांना पदोन्नती मिळणे मुश्किल आहे. मात्र, सुपे यांच्याकडे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालकाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवला जावू शकतो. या सर्वच नियुक्त्यांमध्ये ऐनवेळेस काही मोठ्या “गडबडी’ झाल्यास फेरफारही होऊ शकतात, असे विशेष सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.