पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले आणि दररोज प्रवासी, शेकडो रेल्वेची ये-जा असणारे पुणे रेल्वे स्टेशन मंगळवारी (27 जुलै) 97 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. रुंद प्लॅटफॉर्म, विस्तारलेले रेल्वे जाळे आणि अनोखी रचना असणारी ऐतिहासिक इमारत अशा अनेक बाबी नागरिकांचा प्रवास अधिकच सुखकर करत आहेत. हे स्थानक मंगळवारी सेवेची 96 वर्षे पूर्ण करत असून, शतकाकडे वाटचाल करत आहे.
1915 साली स्थानकाचे पहिले डिझाईन तयार करण्यात आले. तर पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली 1922 मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले. 1925 मध्ये काम पूर्ण होवून, 27 जुलै 1925 रोजी तत्कालीन गव्हर्नर यांच्या हस्ते स्थानकाचे उद्घाटन झाले. पहिली रेल्वे धावल्यानंतर काही वर्षांतच पुणे-मुंबई रेल्वेमार्ग बांधण्यात आला. सध्या पुणे स्थानकासह शिवाजीनगर आणि हडपसर ही दोन मोठी स्थानके विकसित झाली आहेत.
पुणे स्थानकातून दररोज 200 रेल्वे ये-जा करतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर या संख्येत घट झाली आहे. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या स्थानकाच्या अनेक समस्या अद्यापही प्रलंबित आहेत. यामध्ये स्थानकाचा प्रलंबित विस्तार, सुरक्षा यंत्रणा, अनधिकृत प्रवेशद्वारे, स्थानकाच्या आवारातून उपलब्ध होणारी सार्वजनिक वाहतुकीची साधने, पार्किंग व्यवस्था आदींचा समावेश आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या स्थानकाच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
आज कृतज्ञता सोहळा
पुणे रेल्वे स्टेशनला 20 वर्षांपूर्वी मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरवले. स्टेशनला ऐतिहासिक वास्तूचा दर्जादेखील प्राप्त झाला आहे. आशिया खंडातील पहिली डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेस आणि पुणे-मुंबई विद्युत लाईन ही पुणे स्टेशनची देणगी आहे. रेल्वे स्थानक 27 जुलै रोजी 97 वर्षात पदार्पण करत आहे. आम्हा सर्वांना प्रेमाची साथ देणाऱ्या आणि सर्वांना सामावून घेत सावली देणाऱ्या वास्तुचा “कृतज्ञता सोहळा’ वाढदिवसाच्या निमित्ताने प्रवाशांच्या वतीने आयोजित केला असल्याची माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दिली.