पुणे -जमिनीच्या व्यवहारात अनेकांना गंडा घालून वर्षभरापासून फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी अटक केली. मागील वर्षभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
त्याच्यावर एकूण 16 गुन्हे दाखल असून त्यातील तीन गुन्ह्यांमध्ये मोक्का लावला आहे. तर त्याच्या टोळीतील साथीदारांवर एकूण 22 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यातील 13 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
रवींद्र बऱ्हाटे याच्या पत्नीला व मुलाला गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली होती. हडपसर पोलीस ठाण्यात सुमंत रंगनाथ देठे (वय 58, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात सहभाग तसेच कटात सहभागी असल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. संबंधित गुन्ह्यात रवींद्र बऱ्हाटे, कथित पत्रकार देवेंद्र जैन याच्यासह 13 जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली.
यानंतर बऱ्हाटेच्या मुलीची, जावयाची व इतर नातेवाइकांचीदेखील चौकशी सुरू करण्यात आली होती. याची माहिती मिळताच कुटुंबीयांना वाचवण्यासाठी धडपड करताना बऱ्हाटे पोलिसांच्या हाती लागला. बऱ्हाटे हा कोथरूड पोलीस ठाण्यात 7 जुलै 2020 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी होता.
न्यायालयाने त्याला फरार घोषित केल्यानंतर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई महसुल विभागाने केली बऱ्हाटे याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे 2 हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांनी केली.
रवींद्र बऱ्हाटेला अटक करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याची पथके प्रयत्नशील होती. त्याच्याकडील चौकशीमध्ये तो आजवर कोठे कोठे राहून गुंगारा देत होता हे उघड होईल.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त