पुणे -राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाने संधी दिली तर पुण्याची लोकसभा लढवेल असे वक्तव्य केले आहे. आमचा त्याला आक्षेप नाही. मात्र, त्यापूर्वी राष्ट्रवादीने बारामती मतदारसंघ कॉंग्रेसला द्यावा आणि पुण्याची निवडणूक लढवावी, असे प्रत्युत्तर कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी दिले.
महाविकास आघाडीच्या एकजुटीने कसब्यात विजय मिळाला, हीच एकजूट पुणे लोकसभा मतदारसंघातही कायम रहावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, पवार साहेबांनीच आपल्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याला खडा टाकून पाहणारे विधान करायला लावले आहे अशी कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांची भावना आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांत शरद पवार यांनी गौदम अदानी, पंतप्रधानांची पदवी याबाबत भाजपला अनुकूल विधाने केली आहेत. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकत आहे. जिह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ असून त्यातील तीन राष्ट्रवादीला देण्यात आले आहेत तर एक कॉंग्रेसकडे आहे असे असतानाही असे विधान होणे अनाकलनीय असून पुण्याचा जागेवरही राष्ट्रवादीचा डोळा असल्याची टीका प्रकाश पवार यांनी केली आहे.
आघाडीत बिघाडीची शक्यता
जगताप यांच्या वक्तव्याने कॉंग्रेसमध्ये नाराजी व्यक्त होत असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रशांत जगताप यांचे नाव घेत आघाडीच्या चर्चेत या बाबत विषय काढला जाईल, तसेच राष्ट्रवादीला जागा मिळाल्यास प्रशांत जगताप यांना संधी देऊ असे विधान केले आहे. त्यामुळे, जगताप यांच्या विधानावर आक्षेप येत असतानाच आता थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनीच जगताप यांच्या वक्त्व्याचे समर्थन केल्याने पुण्यात आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.