श्रीगोंदा -शहरासह संपूर्ण तालुक्यात महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त तालुकाभर विविध उपक्रम राबविण्यात आले. नगरपालिकेत नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्षा ज्योती खेडकर, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. शहरातील बाह्यवळण रस्त्यालगत महात्मा फुले चौकात विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.
तिथे 80 फूट उंचीचा समताध्वज उभारण्यात आला. शहरातील नवजीवन हॉस्पिटल येथील रक्तदान शिबिरात 51 दात्यांनी रक्तदान केले. तालुक्यातील बेलवंडी, पारगाव सुद्रिक, लोणी व्यंकनाथ, देवदैठण, हिरडगाव, घोगरगाव, मांडवगण आदी गावांमध्ये महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. यामध्ये कोळगाव येथे माजी सरपंच हेमंत नलगे यांच्या हस्ते महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कोळगाव येथे सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.
आढळगाव येथे खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे, सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. काष्टी येथे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकत्र साजरी करण्यात आली. तिथे प्रा. प्रशांत खामकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.