मुंबई – बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा ( Remo DSouza ) याला काल हृदयविकाराचा झटका ( heart attack ) आला आहे. यानंतर त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेमोच्या हृदयात काही ब्लॉकेज होते. डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली असून तो सध्या आयसीयूमध्ये आहे. त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. पुढील 24 तास खूप महत्त्वाचे आहेत, अशी माहिती रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने दिली होती.
दरम्यान, आता रेमोच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा अहमद खानला रेमोच्या प्रकृतीविषयी विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की, रेमोला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचा फोन मला आला होता. आम्ही सर्वजण काळजीत होतो, पण आता त्याची प्रकृती ठीक आहे. तो बरा होत आहे. त्यामुळे आता काळजीचे काही कारण नाही.
रेमो डिसूझाने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. तसेच कोरिओग्राफीशिवाय रेमोने “एबीसीडी’, “एबीसीडी 2′ आणि “स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. “डान्स इंडिया डान्स’, “डान्स प्लस’ आणि “झलक दिखला जा’ यासारख्या रिऍलिटी शोमध्ये त्यानं परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली होती.