लाखोंच्या नुकसानीप्रकरणी सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
पुणे – शहरातील बंद भुयारी मार्ग आणि पादचारी उड्डाणपुलांच्या दुरवस्थेवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला मंगळवारी मुख्यसभेत धारेवर धरले. कोट्यवधी खर्चून उभारलेले हे मार्ग सुरक्षित नाहीत. त्याचा वापर दारूडे, गुन्हेगार करत असून सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे मार्ग बंद ठेवले असून महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची टीका नगरसेवकांनी करत, हे मार्ग सुरक्षित करून सुरू करण्याची मागणी केली.
जंगली महाराज रस्त्यावरील कै. शिवाजीराव भोसले भुयारी मार्ग बंद आहे. तो सुरू करण्यासाठी प्रशासनाने त्याची पाहणी करत आतील गाळे भाडेकराराने देण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. या निविदा मान्यतेसाठी आल्यानंतर नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी आक्षेप घेतला. येथे शाळा तसेच महाविद्यालय असून मुलींची संख्या मोठी आहे. या मार्गात दारूडे तसेच गुन्हेगारांचा वावर असल्याने तो बंद केला होता. मात्र, आता तो सुरू करताना काय उपाययोजना करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर नगरसेवक रघुनाथ गौडा, अजय खेडेकर, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, गायत्री खडके यांनीही भुयारी मार्गांची दुरवस्था झाल्याचे सांगितले.
स्वारगेट भुयारी मार्गाची लवकरच तपासणी
स्वारगेट भुयारी मार्गातील सांडपाणी, कचऱ्याबाबतही नगरसेवकांनी तक्रारी केल्या. या मार्गाची दुरुस्ती नक्की कोण करणार? असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना, “या भुयारी मार्गाचे काम एमएसआरडीसीने केले असून त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी त्यांचीच आहे. त्यांच्याकडूनच ही दुरुस्ती होणार आहे. त्यासाठी पाहणी केली जाणार आहे, असे बोनाला यांनी सांगितले.
भुयारी मार्गांची सुरक्षा, तसेच जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची आहे. जंगली महाराज रस्त्यावरील भुयारी मार्गाच्या सुरक्षेसाठी कर्मचारी नेमण्याचे तसेच लाइट आणि इतर आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.
– श्रीनिवास बोनाला, विभागप्रमुख, वाहतूक नियोजन