पॅरिस – सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याने डाव्या खांद्याला झालेल्या दुखापतीनंतरही सरस खेळ करत फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
जोकोवीचने उपांत्यपूर्व फेरीत पाब्लो कॅरेनो बुस्टाचा 4-6, 6-2, 6-3, 6-4 अशी मात केली. या सामन्यात जोकोवीचचा डावा खांदा दुखावला होता. त्याने फिजिओकडून प्राथमिक उपचार घेत सामना पुढे खेळणार असल्याचे स्पष्ट केले. पहिला सेट गमावल्यानंतरही त्याने अत्यंत तडफेने सामन्यात पुनरागमन केले. उर्वरित तीनही सेट जिंकत त्याने विजयासह या स्पर्धेची 10 व्या वेळा उपांत्य फेरी गाठली. या स्पर्धेत राफेल नदालसह जोकोवीचलाही संभाव्य विजेता मानले जात आहे.
महिला एकेरीत अमेरिकेच्या सोफिया केनिनने आपल्याच देशाच्या डॅनियल रोझ कार्लोसचा 6-4, 4-6, 6-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अन्य सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोव्हाने जर्मनीच्या लॉरा सिजमंडचा 6-3, 6-3 असा सहज पराभव केला व उपांत्य फेरी गाठली.
महिलांच्या अन्य सामन्यांत पोलंडच्या इगा स्विटेकने कारकिर्दीत प्रथमच ग्रॅंडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तिने पात्रता फेरीतून आलेल्या इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनचा 6-3, 6-1 असा सहज पराभव केला. 1968 नंतर या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी स्विटेक पोलंडची पहिली महिला टेनिसपटू ठरली.