आबुधाबी – दिल्ली कॅपिटल्स संघाने अद्याप एकाही सामन्यात खेळण्याची संधी न दिल्याने सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणे लवकरच खेळाडू देवाण-घेवाण नियमानुसार (मिड सीझन ट्रान्सफर) अन्य संघाकडून खेळताना दिसणार आहे. दिल्ली संघाच्या संघ व्यवस्थापनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रहाणेला दिल्ली संघाने घेतले होते. मात्र, त्याला अद्याप एकाही सामन्यात खेळवले गेलेले नाही. स्पर्धेसाठी जे नवे नियम तयार केले गेले आहेत त्याचा लाभ घेत येत्या काही दिवसांत रहाणे अन्य संघाकडून खेळताना दिसणार आहे.
रहाणेला अन्य संघात बदली खेळाडू म्हणून जाण्याची मुभा आहे. त्याच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी कोणत्या संघाने अद्याप प्रस्ताव दिलेला नसला तरीही येत्या काही दिवसांत असा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे, असा खुलासा दिल्ली संघ व्यवस्थापनाने केला आहे.
सध्या पृथ्वी शॉ व शिखर धवन हे सलामीला येऊन चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यात बदल करण्याची आवश्यकता वाटत नाही.
रहाणे चांगला खेळाडू आहे यात वाद नाही. मात्र, सध्याचा संघ समतोल विनाकारण बिघडविण्याची गरज नाही. त्यामुळे त्याला जर अन्य संघाकडून प्रस्ताव आला व त्याने तो स्वीकारला तर त्यावर आमची हरकत नसेल, असेही संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.