मुंबई : राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समुहसंसर्गाची लक्षणे अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘कोरोना’ संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो. त्यासाठी राज्यातील जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात काम करत असलेले डॉक्टर, आरोग्य, पोलीस, महसूल, बँक कर्मचारी तसेच शासनाच्या विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले असून शासकीय यंत्रणा ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी तयार असल्याचा विश्वास राज्यातील जनतेला दिला आहे.
राज्यातली शासकीय यंत्रणा ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी सज्ज आहे. ‘कोरोना’ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून हजार शासकीय व खाजगी रुग्णालयांत 'महात्मा फुले जन आरोग्य योजनें'तर्गत हे उपचार केले जाणार आहेत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 29, 2020
तसेच‘कोरोना’ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हजार शासकीय व खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हे उपचार केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलेल्या आवाहनाचं जनतेने पालन करावं. राज्य सरकार, केंद्र सरकार व देशातील जनता सर्व मिळून ‘कोरोना’च्या विरुद्धचा लढा आपण जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.