वाघोली (प्रतिनिधी)- गेल्या दोन वर्षांपासून केसनंद ग्रामपंचायत सरपंच प्रमोद हरगुडे यांच्याकडून 10 वीच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना ये-जा करणे सोपे व्हावे, यासाठी मोफत रिक्षा व बसची सोय करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
प्रमोद हरगुडे मित्र परिवाराच्या वतीने केसनंद मधील 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व रिक्षाची सोय करण्यात आली आहे. पेपरपूर्वी सोडणे व पेपरनंतर परत आणले जाणार आहे. आज परीक्षेपूर्वी मुलांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा देत रवाना करण्यात आले. केसनंद मधील मुलांचे परीक्षा केंद्र वाडेबोल्हाई, वाघोली येथे आहे.
सर्वच मुलांना परीक्षा केंद्राला जाण्यासाठी त्यांच्या पालकांकडे वाहन नसल्याने प्रमोद हरगुडे मित्र परिवाराने बस व रिक्षाची मोफत सोय करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी 150 मुलांना गुलाबपुष्प देवून शुभेच्छा देण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी उत्साहात परीक्षा द्यावी, यासाठी गेल्या दोन वर्षापासून मोफत बस परीक्षा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवला जात असून या कामी पालकांचे देखील सहकार्य होत असल्याचे प्रमोद हरगुडे यांनी सांगितले.