पालक, मुलांसाठी मोफत व्यवसाय मार्गदर्शन

सातारा  (प्रतिनिधी) – करोनाच्या संकटामुळे शाळा बंद झाल्या, विद्यार्थी घरात बसले, पालक हताश झाले. शिक्षकांना काळजी वाटू लागली पण या संकटावर मात करून विद्यार्थ्यांचे अध्ययन थांबू नये, शिक्षण प्रक्रिया सुरू रहावी, त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे, त्यांचे योग्य प्रकारे समुपदेशन व्हावे. विद्यार्थी अथवा पालकांच्या मनात काही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू झाले. त्यापैकी एक अत्यंत उपयुक्त आणि स्तुत्य असा उपक्रम म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार यासाठी राज्याच्या व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यातून प्रशिक्षित व अनुभवी अशा समुपदेशकांची निवड करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये यासाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष निर्माण करण्यात आला आहे . डाएटचे प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर,प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती कोळेकर यांच्या समन्वयातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आपल्या पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्या पर्यंत ही माहिती प्रसारित करत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये यासाठी 20 समुपदेशकांची निवड करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा समुपदेशक म्हणून कृष्णा बोराटे, व विभाग प्रमुख म्हणून नामदेव शेंडकर हे कामकाज पाहत आहेत. दहावीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढच्या करिअरसाठी अथवा आपल्या कोणत्याही स्तरावरील पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.