सातारा (प्रतिनिधी) – कर्करोग आजाराच्या यादीत स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकावर असून प्रत्येक स्त्रीने दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाची तपासणी केली पाहिजे. स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी स्त्रियांनी स्वतःच स्वतःची स्तन तपासणी करणे आणि मॅमोग्राम (स्तनांचा एक्स-रे) यांचा वापर केला जातो.
म्हणूनच आँन्को लाईफ कँन्सर सेंटर, सातारा यांच्यातर्फे जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ब्रेस्ट थर्मल स्क्रिनींग हे स्तन कर्करोगाच्या निदानासाठी नवीनतम आणि अत्याधुनिक मशीनचे उदघाटन आज करण्यात आले.
हे तंत्रज्ञान पानबाई फाऊंडेशनचे चंद्रकांत गोगरी, सागर तन्ना यांच्यातर्फे देणगी स्वरूपात रूग्णालयास देण्यात आले. या मशिनचे अनावरण डॉ. रवी वाटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले तर याप्रसंगी डॉ. तेजल गोरासिया, संचालक डॉ. प्रताप राजे-महाडीक, या प्रकल्पाचे प्रमुख आणि रूग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन देशमुख, डॉ. अमोल पवार, डॉ. अहल्या नायर आणि नर्सेस, कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ४५ महिलांची ब्रेस्ट थर्मल स्क्रिनींग तपासणी करण्यात आली. तसेच डॉ. प्रसाद कवारे यांनी अत्याधुनिक ओरल थर्मल स्क्रिंनीग या तंत्रज्ञानाचा वापर करून ४५ महिलांची ओरल थर्मल स्क्रिंनीग तपासणी करण्यात आली.
स्तनाचा कर्करोग हा जागतिक स्तरावर स्त्रियांमध्ये सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. वेळीच निदान व यशस्वी उपचारांमुळे कर्करोग बरा होऊ शकतो. स्तन कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांना कर्करोगाचा धोका अधिक असतो. या महिलांसाठी स्तनाच्या नियमित तपासण्या महत्त्वाच्या आहेत कारण त्या वेळीच निदान करण्यास फायदेशीर ठरतात.
यासाठी साताऱ्याच्या ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या या अत्याधुनिक थर्मोग्राम मशिनमुळे स्तन कर्करोग निदानास मदत होईल आणि जास्तीत जास्त महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुरू झालेल्या या उपक्रमाव्दारे दररोज मोफत ब्रेस्ट थर्मल स्क्रिनींग केले जाणार असून त्याकरिता पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी 7030362222|7769004343 या क्रमाकांवर संपर्क साधा.