जामखेड (प्रतिनिधी) – करोनाचे रुग्ण वाढल्याने सध्या जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गेल्या 10 एप्रिलपासून जामखेड शहर पूर्णपणे बंद असल्याने तळीरामांची अडचण झाली आहे. काय करावे हा प्रश्न मद्यपींना पडलेला असताना जामखेडमध्ये सोशल मिडीयावर आलेली जाहिरात पाहून थोड्या वेळासाठी सुखावलेल्या तळीरामांची ऑनलाईन फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. शहरातील नामांकित असलेल्या एका वाईन शॉपी यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट खोलून भामट्याने मद्यपींना ऑनलाईन घरपोच दारू देण्याचे अतिष दाखवून ऑनलाइन फसवणूक सुरू केली आहे.
22 मार्चचा जनता कर्फ्यू झाल्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. सध्या हॉस्पिटल, मेडिकल, दूध व भाजीपाला वगळता अन्य खरेदी – विक्री बंद करण्यात आली आहे. यामध्ये बिअरबार, परमिट रुम, वाईन शॉपचा समावेश आहे. दररोज मद्य पिणाऱ्यांची सध्या पुरती पंचायत झाली आहे. सुरुवातीच्या काळात काही दिवस कशीबशी गरज भागवली. दुप्पट, तिप्पट, चौपट पैसे देऊन तळीरामांनी आपली गरज भागवली. केंद्र शासनाने पुन्हा लॉकडाऊनमध्ये वाढ करून दि.3 ते 17 मेपर्यंत केली आहे. बाहेर पडावे तर पोलीस पकडतात, चोरट्या मार्गाने कुठे मिळेल का याची चौकशी करून मद्यपी घरात शांत बसत आहेत. अशा स्थितीत फेसबुक सर्च करताना मद्यांच्या बाटल्या दाखवून होम डिलेव्हरी करणाऱ्या जाहिराती पाहावयास मिळत आहेत.
मागील दहा ते पंधरा दिवसांपासून जामखेड शहरातील नामांकित असलेल्या एका वाईन शॉपीच्या नावाने फेसबुकवर दुकानाचे नाव टाकून “वाईन होम डिलेव्हरी’ या नावाने बनावट अकाऊंट सुरू करून मद्यविक्री दुकानांच्या फोटोसह फसवे मोबाइल नंबर फेसबुकवर टाकून मद्यपींना फसवले जात आहे. 5 ते 6 फोटो व मोबाइल क्रमांकासह फेसबुक पेज आहे. त्यामुळे जनसामान्यांनाही हे फेसबुक पेज खरेच असावे, असा भ्रमही निर्माण होतो. शहरातील एक नामांकित असलेल्या ही जाहिरात पाहून मद्यासाठी आसुसलेली मंडळी फेसबुकवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करीत आहेत.
संपर्क केल्यानंतर मोबाईलवरील व्यक्ती कोणता ब्रॅंड हवा आहे? अशी विचारणा करतो. संपर्क करणाऱ्या व्यक्तीने ब्रॅंड सांगितल्यानंतर त्याची किंमत सांगितली जाते. मद्यपी जास्तीत जास्त मालाची मागणी करतो, तेव्हा त्याला पैसे गुगल पे वरून भरण्यास सांगितले जातात. काही झालं तरी दारू मिळाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मद्यपी गुगल पे व अन्य ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवतात. पैसे मिळाल्यानंतर देण्यात आलेला मोबाईल नंबर बंद केला जातो. अशा पद्धतीने सध्या तळीरामांची ऑनलाईन फसवणूक होत आहे.
भामट्याने दुकानाचे नाव टाकून “वाईन होम डिलेव्हरी’ या नावाने फेसबुक खाते उघडण्यात आले असून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे. अश्या प्रकारची कोणतीही योजना दुकानातर्फे राबविण्यात येत नाही. सरकारी आदेशानुसार दुकान बंद असून विक्री केली जात नाही. या पोस्टमध्ये देण्यात आलेला मोबाईल नंबर हा फसवा असून कोणी ही कसल्याही प्रकारचा व्यवहार करू नये, झालेल्या व्यवहारात आमची कसली ही जबाबदारी नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
मद्य विक्रेता
जामखेड