नगर – करोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सोमवारी काहीशी शिथिलता मिळाल्याने नगर शहरातील रस्त्यांवर सकाळीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी दिसून आली. कन्टेमेंट झोन वगळता जिल्हा प्रशासनाकडून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून निर्माण झालेल्या संभ्रमामुळे अनेकांची पंचायत झाली होती. त्यामुळे अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने किरकोळ स्वरूपात उघडण्यात आली. पोलीस, नागरीकांसह व्यापाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा अर्थ आपल्या सोईनुसार घेतल्याने नगरमध्ये गोंधळात गोंधळ झाला.
पोलिसांनी अजूनही अत्यावश्यक वस्तूंची दुकाने गृहीत धरीत अन्य दुकाने बंद करण्याचा फर्मान काढला. तर गल्ली किंवा भागात एकल दुकानेच केवळ सुरू राहणार असल्याच्या आदेशामुळे एकल दुकान असतांनाही अनेकांनी दुकाने न उघडणे पसंत केले. आजपासून दुकाने उघडणार म्हणून अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्त अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी नगरकर सकाळी रस्त्यावर आले होते. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. कारण दुकानेच बंद होती. त्यामुळे सकाळी अकरा साडेअकरापर्यंत नगरच्या रस्त्यावर असलेली गर्दी त्यानंतर ओसरली. काही प्रमाणात दुचाकी दुरुस्ती, वाहनांची सुटे भाग विक्रेते, गॅरेज, ही दुकाने उघडली होती. त्यांनी देखील दुपारनंतर दुकाने बंद केली. आडतेबाजारात मात्र गर्दी होती. किराणा सामान खरेदीसाठी गर्दी झाल्याने या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णत:फज्जा उडाला होता.नगर जिल्हा ऑरेंज झोनच्या आदी असल्याने नगर जिल्ह्यात काय सुरू होणार आणि काय बंद राहणार याबाबत संभ्रम होता.
सोमवारपासून हे सुरू राहिल कृषी –
शेतीमाल खरेदी विक्री, बाजार समित्या, कृषी उपकरणे, यंत्रे बनविणारे दुकाने व कारखाने, शेतीमाल वाहतूक व विक्री बियाणे, खते किटकनाशकांची विक्री सुरू राहिल. आस्थापना- शासकीय कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार 33 टक्केपर्यंत उपस्थिती राहिल, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, माहिती तंत्रज्ञान व त्यावर आधारीत सेवा सुरू राहतील, कोल्ड स्ट्रोरेज, वेअर हाऊसेस, खाजगी सुरक्षा सेवा, इमारतींच देखभालीसाठी, सहाय्यभूत ठरणार व्यवस्थापन सुविधा सुरू राहतील,महापालिका नगरपालिका हद्दीतील बाजारपेठा व बाजार संकुलात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने सुरू राहतील. महापालिका नगरपालिका हद्दीतील एकल वसाहतीतील लगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरू राहतील. तथापि आशा भागात एखाद्या गल्लीत रस्त्यालगत 5 पेक्षा अधिक दुकाने असल्यास अशा दुकानांपैकी जीवनाश्यक वस्तूूंची विक्री करणारीच दुकाने सुरू राहितील. ग्रामीण भागात मॉल वगळता सर्व दुकाने सुरू राहतील. दुकानासमोर गर्दी दिसल्यास दुकान सील केले जाईल. सार्वजनिक सुविधा- डिझेल विक्री 24 तास. पेट्रोल विक्री सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत. दुष्काळ टंचाई निवारणाची कामे सुरू राहितील, शासकीय निमशासकीय कार्यालये सुरू राहतील, अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 10 व्यक्तींनाच परवानगी, प्रसार माध्यमांचे कार्यालये सुरू राहतील, चिक्स, चिकण, अंडी, दुकाने सुरू राहतील, पशूवैद्यकीय दवाखाने, औषाधालये. वाहतूक – सर्व वस्तू व मालाची वाहतूक करता येईल. रेल्वेव्दारे वस्तू माल पार्सल यांची ने आण करता येईल. सर्वप्रकारचे वस्तू व माल वाहतूक करणारा ट्रक व तसम वाहने हे वाहतूक करताना दोन चालक एक हेल्पर यांच्या सोबत वाहतूक करतील. तसेच माल वस्तू पोहोच केल्यानंतर रिकाम्या झालेल्या वाहनांना देखील वाहतूकीसाठी परवानगी असेल. ट्रक व तसम व माल वाहतूक करणाऱ्या वाहनाची दूरुस्ती करणारी दुकाने सुरू राहतील, तथापि संबंधितांना केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. रेल्वे वाहतूकीच्या ठिकाणी कामावर जाणारे अधिकारी व कर्मचारी कंत्राटी कामगार यांना संबंधित अस्थापना यांनी दिलेल्या अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगूनच कामावर हजर राहता येईल. अत्यावश्यक सेवांकरिता चारचाकी वाहनांमध्ये केवळ वाहन चालक व इतर दोन व्यक्ती यांना परवानगी राहील, तसेच दुचाकी वाहनांसाठी केवळ वाहन चालकांनाच परवानगी राहिल. उद्योग- ग्रामीण भागात सामाजिक अंतर ठेऊन उद्योग सुरू करता येतील.
मद्यपी सकाळी निराश; सायंकाळी खूश
प्रशासनाने ग्रामीण भागातील सर्व तसेच शहरी भागातील एकल वसाहतीतील दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश काढले असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढील आदेश येईपर्यंत मद्य विक्रीची दुकाने खुली करू नयेत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात मद्य विक्रीची कोणतीही दुकाने सुरू होणार नाहीत. त्यामुळे तळीरामांच्या पदरी निराशा आली आहे. दरम्यान, सायंकाळी उशीरा मद्यविक्रीबाबत प्रशासनाने नवा आदेश काढला. त्यानुसार मद्यविक्रीची दुकाने सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत खुली राहणार आहेत. तथापि, लॉकडाऊनच्या अटी आणि शर्तींचे मद्य विक्रेत्यांना पालन करावे लागणार आहे. त्यामुळे सकाळी निराश झालेले मद्यपी सायंकाळी खुशीत होते.
काय बंद राहणार
रेल्वे प्रवाशी वाहतूक -अंतराज्य बससेवा, वैद्यकीय कारण अथवा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या व्यतिरिक्त आंतरराज्य वैयक्तिक प्रवास, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आदी, शॉपिंग मॉल, सिनेमागृह, व्यायामशाळा, धार्मिक कार्यक्रम, सर्व प्रकारचे धार्मिक, प्रार्थनास्थळे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर संध्याकाळी 7 ते सकाळी 7 यावेळेत निर्बंध राहतील. 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती, गर्भवती महिला व 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहिल. हॉटस्पॉटमध्ये मेडीकल क्लिनिक व ओपीडी सुरू करण्यास बंदी राहिल. सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.