पिंपरी – आयपीएलच्या धर्तीवर मराठा लीग ही क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी गुंतवणूक केल्यास सहा महिन्यात 20 टक्के जादा परतावा आमिष दाखविण्यात आले. आरोपींनी संगनमत करून चार जणांनी एक कोटी 48 लाख 39 हजारांची फसवणूक केली. वाकड येथे ही घटना घडली.
स्वेअरकटस स्पोटर्स प्रा. लि. कंपनीचे विन्सेट जॉन, त्याची पत्नी, रवी पनवर, गणेश दिघे, नरेश लक्ष्मणराव पिल्ले, अभिजित रावकर, आणि एक महिला (पूर्ण नाव उपलब्ध नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मॅकविन जेरोम सलढाणा (वय 43, रा. लक्ष्मी निवास बंगला, माहीम, मुंबई) यांनी शनिवारी (दि. 6) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 1 मार्च 2020 ते 6 मार्च 2020 या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून स्वेअरकटस स्पोटर्स प्रा. लि. कंपनीच्या वतीने आयपीएलच्या धर्तीवर मराठा लीग ही क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून करार केला. 20 टक्के जादा परताव्याचे आमिष दाखविण्यात आले. परताव्यासाठी दिलेल्या धनादेश न वटण्यासाठी स्टॉप पेमेंट केले.
आरोपींनी फिर्यादी मॅकविन, त्यांचे मित्र महेंद्र शहा, पल्लवी शहा आणि दिशा शहा यांची एक कोटी 48 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पवार तपास करीत आहेत.