- लुटमार करीत चार वाहनांची केली तोडफोड
पिंपरी – पिंपरीमध्ये गुरुवारी रात्री टोळक्याने राडा घातला होता. दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी (दि. 5) पिंपरीतील यशवंतनगर परिसरात टोळक्याने पुन्हा वाहनांची तोडफोड करत लुटमार केली. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे पिंपरी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शंकर उर्फ गड्ड्या चौधरी (वय 20, रा. यशवंतनगर, पिंपरी), बाळ्या (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही), रोहित मुकिदा पवार (वय 19) अविनाश नागनाथ माने (वय 20, दोघेही रा. टेल्को रोड, भोसरी) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रामशंकर उदयराज गुप्ता (वय 55, रा. शिवसाई पार्क सोसायटी, यशवंतनगर, पिंपरी) यांनी याबाबत शनिवारी (दि. 6) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी गुप्ता हे आपल्या मालकीचे पटवा ट्रान्सपोर्ट सर्विस हे ऑफिस बंद करून घरी आले. त्यावेळी सोसायटीच्या पार्किंगमध्ये आलेल्या आरोपींनी विनाकारण त्यांना अडवले आणि हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
तसेच त्यांच्या खिशातील आठ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी गुप्ता राहात असलेल्या सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरेही आरोपींनी फोडले. तसेच गुप्ता यांच्या मोटारीवर (एम. एच. 14/डी. टी./9813) दगड मारून तिच्या काचा फोडल्या.
त्यानंतर गुप्ता यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिससमोर गेले. तेथे पार्क असलेल्या एम.एच. 14 सी.पी.7112, एम.एच.14 जी.यू.7813 आणि एम. एच.14-बी.जे.0943 या ट्रकच्या काचा फोडून नुकसान केले. त्यानंतर आरोपींनी आरडाओरडा करत शांततेचा भंग केला व परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत.