पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : मैत्रिणीला माॅडेलिंगसाठी नेल्याने सराइताने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना टिळक रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी सराइतासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ओम गायकवाड, त्याचे साथीदार आनंद, रोहन, सुमित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत राजकुमार शिंदे (वय १९, रा. लोहियानगर, गंज पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गायकवाड सराइत आहे. गायकवाडच्या मैत्रिणीला वेदांतने माॅडेलिंगसाठी नेल्याने तो वेदांतवर चिडला होता. मंगळवारी (दि. ५) सायंकाळी आरोपी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी वेदांतला टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय परिसरात गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याची धमकी देऊन चौघे पसार झाले.
या घटना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध सुरू असून, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे तपास करत आहेत.