पुणे – मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी, सीमकार्ड अपडेट करण्याचे आमिष दाखवून नागरिकांच्या बॅंक खात्यातील पैसे लांबविण्याचे प्रकार घडले आहेत.
सायबर चोरट्यांनी मागील काही दिवसांपासून सीम स्वॅपिंगद्वारे नागरिकांच्या खात्यातील रक्कम काढून घेतल्याचे प्रकार घडले आहेत. मोबाइल क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास किंवा त्याने मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केल्यास प्रतिसाद देऊ नये. प्रतिसाद दिल्यास आर्थिक फटका बसू शकतो, असे सायबर गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले.
कोणतीही मोबाइल कंपनी ग्राहकांच्या क्रमांकावर संपर्क साधून त्यांना वैयक्तीक किंवा गोपनीय माहिती विचारत नाही. अशाप्रकारे कोणी संपर्क साधल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये किंवा चोरट्याने एखादा संदेश पाठविण्यास सांगितल्यास संदेशदेखील (एसएमएस) पाठवू नये, अशाप्रकारे एखाद्याने संपर्क साधल्यास त्वरित मोबाइल कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे किंवा बॅंकेत संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक पायगुडे यांनी केले.
मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली जाते. संभाषणातील त्रुटी (कॉल ड्रॉप), इंटरनेटचा वेग आदी त्रुटी दूर केल्या जातील. त्यासाठी फक्त सीमकार्ड अद्ययावत करावे लागेल, असे चोरट्यांकडून सांगितले जाते. त्यानंतर चोरटा मोबाइल क्रमांकावर एक 20 अंकी सीमकार्ड क्रमांक असलेला संदेश पाठवितो. हा संदेश पुन्हा या 12354 क्रमांकावर पाठविण्यास सांगितले जाते. संदेश पाठविल्यानंतर लगेचच सीमकार्ड बंद पडते. ज्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याकडून संपर्क साधला असेल तो क्रमांक आपोआप चोरट्याकडील सीमकार्डवर सुरू होतो. त्यानंतर बॅंकेकडून येणाऱ्या संदेशाचा गैरवापर करून चोरटा बॅंक खात्यातून पैसे काढून घेतो.