राहुरी : नागरिकांचे सिबिल खराब करणारी टोळी राहुरी पोलिसांकडून जेरबंद करण्यात आली. किरण चिंधे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची उकल करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी फिर्यादी किरण चिंधे यांचा मोबाईल क्रमांक वापरून फिर्यादीचे पॅन कार्डवरील संपूर्ण नाव, पॅन कार्ड नंबर ,जन्मतारीख, बनावट ई-मेल आयडी ,राहण्याचा पत्ता बनावट तयार करून इंडसंट बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून त्याद्वारे एकूण 83 हजारांचा अपहार केला होता. गुन्ह्यातील आरोपीं नवाब उर्फ सोनू हबीब सय्यद ( वय 30, रा. महादेववाडी ता.राहुरी), असलम उर्फ भैय्या चांद पठाण (राहुरी),कारभारी देवराम गुंड (वय 28 रा.महादेव मंदिराशेजारी, कुक्कडवेढे राहुरी,ह मु. प्लॉट नंबर 147 गावटे नगर, घुलेनगर ,मांजरी बु.ता. जि.पुणे) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.
चौकशी करीता एखादे व्यक्तीचे आधार कार्ड व पॅन कार्ड प्राप्त केल्यानंतर त्यावरील माहिती मोबाईलमधील अॅप्लीकेशनच्या माध्यमातून कशाप्रकारे बदलण्यात येते याची माहिती आरोपींनी दिली . पुणे येथील साथीदार यांच्याशी ऑनलाईन व फोनवरून ओळख करून देऊन बनावट बनविलेल्या आधार कार्डवरील पत्ता ,मोबाईल नंबर, ईमेल बनवून त्याद्वारे कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करायचे. क्रेडिट कार्डवरून कशाप्रकारे पैसे काढून आर्थिक फायदा मिळवता येतो, याची माहिती दिली आहे.
परिणामी ज्याच्या नावाने क्रेडिट कार्ड काढलेले आहे, त्याला या गोष्टीचा कुठलाही थांग पत्ता नसतो. परंतु तो जेव्हा बँकेत लोन काढण्यासाठी जातो, त्यावेळी त्याला त्याचे सिबिल खराब झालेले आहे असे समजते. अशाप्रकारे बराच लोकांची आधार कार्ड पॅन कार्ड वापरून त्यांच्या नावाने क्रेडिट कार्ड तयार करून परस्पर फायदा लाटून सर्वसामान्य नागरिक यांचे सिबिल खराब केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने अटक आरोपी यांच्याकडे राहुरी पोलीस तपास करीत आहेत.