नान्टेरे (फ्रान्स) :- पोलिसांच्या गोळीबारात युवकाचा मृत्यू झाल्यानंतर फ्रान्समध्ये सुरू झालेले हिंसक आंदोलन गेल्या चार दिवसांपासून अजूनही सुरू आहे. संतप्त जमावाने ठिकठिकाणी पोलिसांवर हल्ले केले आहेत. तसेच जमावांकङून काही दुकानांची लुटालूट देखील केली जाते आहे.
अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉ यांनी देशातील युवकांच्या पालकांना उद्देशून केलेल्या आवाहनानंतर हे आंदोलन कमी होण्याऐवजी अधिकच भडकले आहे.
कारण या आवाहनामध्ये मॅक्रॉ यांनी मुलांच्या पालकांना “रस्त्यांपासून दूर ठेवावे आणि सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि चिथावणीखोर पोस्ट करू नये.’ असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
या आंदोलनाला मार्सेएली शहरापासून सुरुवात झाली आणि आता हे हिंसक आंदोलन दक्षिण फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये पसरले आहे.