पुणे – दिवाळीनिमित्त खरेदीसाठी हडपसर मंडईत आलेल्यांनी दुचाकी पार्क केल्यानंतर चालकावर पाळत ठेवून दुचाकी चोरणाऱ्यांचे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 5 लाख रुपयांच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मौजमजेसाठी ते दुचाकी चोरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
युनुस निजाम मुल्ला (25, रा. सय्यदनगर, मूळ उस्मानाबाद), हनुमंत वाकडे (22, आलुर जि. उस्मानाबाद), दीपक उर्फ खंडू कटकधोंड (24, रा. केसर जावळा, जि. उस्मानाबाद) अशी चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी अल्पवयीन मुलालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हडपसर हद्दीत दिवाळीनिमित्त खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यातच दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने दुचाकी चोरीच्या अनुषंगाने काम करत असताना पोलीस अंमलदार शाहीद शेख व प्रदीप सोनवणे यांना संशयित आरोपींबाबत माहिती मिळाली.
एक अल्पवयीन मुलगा व त्याचे साथीदार दुचाकी चोरून सोलापूर महामार्गाने जात असल्याचे समजले. परंतु, ते कोठे राहतात याची माहिती मिळाली नव्हती.
मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकातील अंमलदार समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे यांनी तांत्रिक विश्लेषणावरून एक अल्पवयीन मुलगा आणि त्यांचे साथीदार दुचाकी टेहळणी करताना आढळले. त्यानंतर त्यांना पकडण्यासाठी आरोपी ज्या मार्गाने येतात, अशा फुरसुंगी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ सापळा रचून एका अल्पवयीन आरोपीसह चौघांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी आपली टोळी बनवून हडपसर, वानवडी, स्वारगेट, फरासखाना भागात गाड्यांची टेहाळणी करून दुचाकी चोरल्याचे सांगितले.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.