शोपियान चकमकीत चार दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील शोपियान येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. दक्षिण काश्‍मीरच्या दरमदोरा परिसरात आज सकाळपासून चकमक सुरू असून यामध्ये चार दहशतवादी ठार झाले आहेत. या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून अद्यापही सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरूच आहे.

रफी हस्न मीर, सुहैल अहमद भट, शौकत अहमद मीर आणि आझाद अहमद खानदाय असे ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलाने दारामदोर परिसराला वेढा दिल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्याने गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्याला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले. तर परिसरात अद्याप शोधमोहीम सुरू आहे.

“हिज्बुल मुजाहिदीन’ संघटनेचा दहशतवादी शौकत अहमद मीर हा 2015पासून विविध कारवायांमध्ये सक्रिय होता. तर अन्य तीन जणांनी नुकताच दहशतवादी संघटनेत प्रवेश केला होता. या तिघांच्या माध्यमातून शौकत हा दहशतवाद्यांची भर्ती करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, मध्य काश्‍मीरात गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात सातत्याने चकमक पाहायला मिळत आहे. शनिवारी बारामुला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत “जैश-ए मोहम्मद’चा दहशतवादी ठार झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा चार दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.