भोर -महुडे बुद्रुक (ता. भोर) येथे शेतात काम करीत असताना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील चौघांवर रानडुकराने हल्ला केल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 24) सायंकाळी पाचच्या सुमारस घडली.
शेतकरी जगन्नाथ दगडू पिलाने (वय 42), कमल जगन्नाथ पिलाने (वय 38), नीता जगन्नाथ पिलाने (वय 24), अनिकेत जगन्नाथ पिलाने (वय 16, सर्व रा. महुडे बुद्रुक) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, वरील चौघे त्यांच्या शेतामध्ये बुधवारी भुईमुगाची खुरपणी करीत होते.
सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये चार-पाच रानटी डुकरांचा कळप आला आणि येथे काम करणाऱ्या चौघांवर या त्यांनी हल्ला केला. या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारचे शेतकरी धावून आले असता रानडुकरे तेथून डोंगर-रानात पळून गेली. या चौघाही जखमींना उपचारासाठी भोर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
या घटनेची माहिती वनक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांना मिळाल्यानंतर वनपाल शिवकुमार होनराव यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन जखमींची विचारपूस केली. चौघा जखमींपैकी अनिकेत पिलाने यास गांभीर जखमा झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवाण्यात आले असल्याचे भोर तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष नितीन दामगुडे यांनी सांगितले.
पहिले अतिपाऊस त्यानंतर करोनामुळे लॉकडाऊन मग चक्रीवादळ यामुळे आधीच बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी तो खरीप हंगामासाठी शेतात राबत आहे. त्यातच रानडुक्करांचे कळपाने हाला झाल्याने महुडे खोऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघांचे जबाब घेतले असून, घटनेचा पंचनामा करून वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठवला जाईल, जेणेकरून जखमींना मदत मिळण्यास सोपे जाईल.
– दत्तात्रय मिसाळ, वनपरीक्षेत्र अधिकारी, भोर