रस्ता कामात घोळ झाल्याचा अभिप्राय; डिसेंबरपर्यंत अंदाजपत्रकाप्रमाणे दुरुस्तीचे आश्वासन
नगर (प्रतिनिधी) – बहुचर्चित तपोवन रस्त्याची अखेर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी काल तपासणी केली. काही ठिकाणी रस्ता खचला आहे. मात्र, येत्या डिसेंबरअखेरपर्यंत या रस्त्याचे अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्यात येईल, असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी महापालिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांना दिले.
येत्या पावसाळ्यात रस्त्याचे संपूर्ण निरीक्षण केले जाईल. त्यानंतर जिथे गरज आहे. तेथील काम पुन्हा करवून घेतले जाईल. तसेच या कामाचे ठेकेदारास अजून बिल अदा करण्यात आलेले नसल्याचे स्पष्टीकरणही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिले.
तपोवन रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्यासह नगरसेवक विनित पाऊलबुधे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, शिवाजी चव्हाण आदींनी रस्त्याच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराने रस्त्याच्या कामात हलजर्गीपणा केला. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिकांनी बांधकामविभाग व ठेकेदारावर नाराजी व्यक्त केली. या रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अशी मागणीही केली आहे. त्यामुळे नगरसेवकांनी आधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता.
आमदार जगताप यांच्यामुळेच मिळाला निधी: संपत बारस्कर
रस्त्याच्या विकासकामासाठी आमदार संग्राम जगताप यांनीच पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निधी वर्ग केला. मात्र, रस्त्याचे काम करताना ग्रामसडक योजनेचे अधिकारी व ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्यासे निकृष्ट दर्जाचे काम झाले. त्यात नागरीकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळ स्थानिक नगरसेवकांवर आली, असा संताप विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी व्यक्त केला.