पुणे शहरात आणखी चार “मॉनिटरिंग’ केंद्रे

हवेच्या गुणवत्तेबाबत अधिक सविस्तर माहिती मिळण्यास होणार मदत

पुणे -“शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घातक होत आहे. मात्र, अद्यापही काही मोजकी ठिकाणे सोडली तर शहरातील बहुतांश भागातील हवेची गुणवत्ता कशी आहे, याची माहिती उपलब्ध नव्हती. मात्र, लवकरच शहरातील काही भागांच्या हवेची गुणवत्तेबाबत माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी “महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी) चार नवीन “मॉनिटरिंग’ केंद्रांची उभारणी करणार आहे.

वाहनातून उत्सर्जित होणारा धूर, उघड्यावर जाळलेल्या कचऱ्यातून होणारे प्रदूषण, रस्त्याच्या कडेची धूळ अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पुण्यातील हवेचे प्रदूषण धोकादायक पातळी ओलांडत असते. मात्र, नेमक्‍या कोणत्या भागात कोणत्या कारणास्तव आणि किती प्रदूषण होते, त्याठिकाणची हवेची गुणवत्ता कशी आहे? याबाबत त्रोटक माहिती सध्या मंडळाकडे उपलब्ध आहे. सद्यस्थितीत मंडळातर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाच ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणी केली जाते. यामध्ये नळस्टॉप, कर्वेरस्ता, भोसरी, स्वारगेट आणि चिंचवड या भागांचा समावेश होतो. मात्र, सातत्याने विस्तारत जाणाऱ्या शहरात केवळ पाच मॉनिटरिंग केंद्रे अपुरी ठरत आहेत. शहरातील इतर भागांमधील हवेची गुणवत्ता मोजता यावी, यासाठी मंडळाने चार नवीन ठिकाणी मॉनिटरिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये हडपसर, बाणेर, कात्रज आणि नगररस्ता यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मॉनिटरिंग केंद्रावर हवेच्या गुणत्तेची माहिती देणारे “डिस्प्ले बोर्ड’देखील बसविण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्‍त पिंपरी-चिंचवड परिसरातही तीन नवीन केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव मंडळाकडे देण्यात आला आहे. नव्याने उभारल्या जाणाऱ्या या केंद्रांमुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत अधिक सविस्तर माहिती मिळण्यात मोठी मदत होणार आहे.

सध्या कार्यरत केंद्रांना “अपडेट’ची गरज
शहरातील हवेची गुणवत्ता मोजणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे यापूर्वी पाच मॉनिटरिंग केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांनी संकलित केलेली हवेच्या गुणवत्तेची माहिती नियमितपणे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. मात्र, नोव्हेंबर 2018 पासून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तांत्रिक कारणास्तव ही माहिती प्रसिद्ध होत नसल्याचे पूर्वीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, 8 महिने उलटूनही अद्याप याबाबत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे नवीन केंद्रे उभारण्यापूर्वी जुनी केंद्रे “अपडेट’ करण्याची गरज निर्माण झाली आहे.

“केंद्र सरकारच्या “नॅशनल क्‍लीन एअर प्रोग्रॅम’अंतर्गत पुण्यात हवा प्रदूषणासंदर्भातील प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पुढील 9 वर्षांसाठी हा प्रकल्प पुण्यात राबविण्यात येणार असून चाडेचार वर्षांचा हा पहिला टप्पा आहे. यामध्ये पहिले सहा महिने प्रदूषणाचे स्वरूप, त्याची व्याप्ती याची माहिती संकलित होणार आहे. यासाठीच प्रकल्पांतर्गत ही “मॉनिटरिंग’ केंद्रे उभारली जात आहेत. ही उपकरणे बसविण्याचे काम पुढील दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल.’
– दिलीप खेडकर, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Leave A Reply

Your email address will not be published.