पुणे पालिका राबविणार “ऑपरेशन कायापालट’

“सीईआर’ फंडातून रस्ते, चौकांच्या सुशोभीकरणासाठी 25 कोटी रुपये मंजूर

पुणे -“शहर ब्युटिफिकेशन’ संकल्पनेच्या अंतर्गत शहरातील विविध रस्ते, चौक, रस्ता दुभाजक आणि उड्डाणपुलांखालील जागांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी हे “कॉर्पोरेट ऍन्ड एन्व्हायर्नमेन्ट रिस्पॉन्सिबिलिटीज’ (सीईआर) फंडातून 25 कोटी रुपये खर्च करण्याला नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली असून महापालिकेच्या माध्यमातून हे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

“सीएसआर’प्रमाणे “सीईआर’ हादेखील फंड अस्तित्त्वात आहे. बांधकाम व्यावसायिकांना तो खर्च करावा लागत होता. मात्र, बांधकाम व्यावसायिकांकडून आपल्याच स्कीममध्ये झाडे लावून आणि स्कीमला जोडणाऱ्या रस्त्यांवर “ब्युटिफिकेशन’ करून तो फंड खर्च केल्याचे दाखवले जात होते. हे सर्व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केले जात असे. या सर्व सुशोभीकरणाचे जादा पैसे बांधकाम व्यावसायिक ग्राहकांकडून “ऍम्युनिटीज’च्या नावाखाली घेतात. वास्तविक या सुविधा देणे त्यांना बंधनकारक आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर सीईआर’ फंडाच्या खर्चाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महापालिकेने स्वत:कडे घेतले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंजुरीही दिली आहे.

गेल्या दोन वर्षांत बांधकाम व्यावसायिकांचे जे प्रकल्प मंजूर झाले आहेत, त्याची यादी काढण्यात आली आहे. त्यातून सुमारे 150 कोटी रुपयांची रक्‍कम उभारली आहे. या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. त्यात “सीईआर’संदर्भात बदल करण्याचे आणि अंतिम मान्यता देण्याचे अधिकार या कमिटीला दिले आहेत. महापालिकेच्या टीमने यामध्ये अभ्यास आणि पाहणी करून काही कामेही सुचवली आहेत. ही कामे स्वच्छ भारत अभियानला लिंकअप केली जाणार आहेत. स्वच्छ भारत टीम आणि बांधकाम विभागाच्या टीमने एकत्र बसून या 150 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील 25 कोटी 70 लाख रुपयांच्या कामांची यादी अंतिम केली असून, ती जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.