भोर- भोर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. 7) चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात सात उमेदवार राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी दिली.
अपक्ष उमेदवार दत्तात्रय राघुजी टेमघरे, यशराज हिरामण पारखी व सुनील दिनकर गायकवाड यांनी माघार घेतली आहे. आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार संग्राम अनंतराव थोपटे, शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार कुलदीप सुदाम कोंडे, मनसेचे अनिल प्रकाश मातेरे, वंचित बहुजन आघाडीचे भाऊ पांडुरंग मरगळे, संभाजी ब्रिगेडचे पंढरीनाथ संपत सोंडकर व अपक्ष उमेदवार आत्माराम जयवंत कलाटे व मानसी सुरेश शिंदे यांच्यात लढत होणार आहे.
महाआघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर झाल्याने त्यांनी मतदार संघ पिंजून काढला आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.