विहिरीत पडलेल्या गव्यांना वाचविले

पाण्याच्या शोधार्थ आलेले 5 गवे विहिरीत कोसळले

पाटण – मोरणा विभागातील मोरगिरी-गुरेघर रस्त्यालगत धावडे गावात पाण्याच्या शोधार्थ आलेले 5 गवे शनिवारी रात्रीच्या सुमारास विहिरीत कोसळले. रात्री उशिरापर्यंत या गव्यांना विहिरीतून बाहेर काढण्याचे काम वनविभागामार्फत सुरू होते. जेसीबीच्या सहाय्याने विहिरीचे कठडे तोडून 5 पैकी 4 गव्यांना बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. मात्र एका गव्याचा जागीच मृत्यू झाला होता. शवविच्छेदन केल्यानंतर घटनास्थळीच त्याचे दहन करण्यात आल्याची माहिती पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी दिली.

मोरणा विभागातील मोरगिरी-गुरेघर रस्त्यालगत धावडे गावात शेंडेचे शेत या शिवारात असणार्‍या एका विहिरीत शनिवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास 5 गवे पडल्याची माहिती वनविभागाला समजली. त्यानंतर पाटणचे वनक्षेत्रपाल व अन्य कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत गव्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबविली. मात्र यात अडचणी निर्माण येत होत्या.

अखेर जेसीबीच्या सहाय्याने विहिरीचे कठडे तोडण्यात आले व एका बाजूने वाट मोकळी करण्यात आली. त्यानंतर विहिरीत पडलेले 4 गवे बाहेर पडले व जंगलाच्या दिशेने गेले. अवघ्या अर्ध्या तासात वनविभागाने हे ऑपरेशन यशस्वी केले. यात एक मादी व तीन पिल्लांचा समावेश होता. मात्र एका मादी गव्याच्या नाका, तोंडात पाणी गेल्याने ती जागीच ठार झाली होती. पाण्यातील मृत गव्याला जेसीबीच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढण्यात आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. रात्र झाल्यानंतर ही मोहीम थांबविण्यात आली.

दुसर्‍या दिवशी रविवार, दि. 4 रोजी सकाळी 10.30 वाजता पाटणच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. विद्या झंजाड व त्यांचे सहकारी डॉ. अमोल वाकडकर यांनी सदर गव्याचे शवविच्छेदन केल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे, पशुधन विकास अधिकारी यांच्या आदेशाने मृत गव्याचे दहन करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.