धक्कादायक.! करोनाबाधितांच्या मृतदेहांचे रॅपिंग किट निकृष्ट

कराड – करोना महामारी रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहे. करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यविधी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे. बाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे मृतदेह विशिष्ट प्रकारच्या बॅग्जमध्ये (रॅपिंग किटस्‌) ठेवून नेले जातात; परंतु कराडच्या येथील सह्याद्री हॉस्पिटलमधून कोविडबाधितांचे मृतदेह निकृष्ट दर्जाच्या रॅपिंग किटमध्ये घालून पाठवले जात असल्याची धक्‍कादायक बाब उजेडात आली आहे. मृतदेह ताब्यात घेताना अथवा अंत्यविधीपूर्वीच ही किटस्‌ फाटत आहेत. त्यामुळे अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते. त्याचबरोबर करोनाचा फैलाव अधिक होण्याचा धोका संभवतो.

कराड तालुक्‍यात उपजिल्हा रूग्णालय, कृष्णा, सह्याद्री, एरम, श्री, कराड हॉस्पिटलसह अन्य खाजगी रुग्णालये आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व अन्य जिल्ह्यांमधील करोनाबाधित रुग्ण गेल्या वर्षभरापासून कराड शहरात उपचारासाठी येत आहेत. कराड शहरात आतापर्यंत दोन हजारांहून अधिक करोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील 100 रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्‍यातील 12 हजारहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले असून, आतापर्यंत 375 बाधितांचा कोविडमुळे मृत्यू झाला. इतर जिल्ह्यातून आलेल्या काही बाधितांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये या वर्षातील 102 रुग्णांचा समावेश आहे.

कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर अत्यसंस्कार करायची जबाबदारी कराड पालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर आहे. या कर्मचाऱ्यांवर गेल्या वर्षापासून प्रचंड ताण आहे. अनंत अडचणी व मानसिक ताणतणावांना सामोरे जात हे कर्मचारी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेत; परंतु त्यांच्याशी सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाला काहीही देणेघेणे नाही. करोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांचे मृतदेह पूर्णपणे पॅक करून ते पालिका कर्मचाऱ्यांकडे सोपवण्याची सर्व जबाबदारी हॉस्पिटल प्रशासनाची आहे.

परंतु निकृष्ट दर्जाची रॅपिंग किटस्‌ वापररून सह्याद्री हॉस्पिटल या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहे. या हॉस्पिटलमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोविडबाधिताचा मृतदेह रविवारी अंत्यसंस्कारासाठी कराड पालिकेच्या कोविड स्मशानभूमीत आला. हा मृतदेह बांधण्यात आलेले रॅपिंग किट फाटले होते. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर काटा आला. अंत्यसंस्कार कसे करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता.

यापूर्वीही तक्रारी
सह्याद्री हॉस्पिटलमध्ये निकृष्ट दर्जाची रॅपिंग किटस्‌ वापरली जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी झाल्या होत्या. त्यावर कोणती कारवाई झाली, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांनी हा प्रकार हॉस्पिटल प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत, चांगल्या दर्जाची किटस्‌ वापरण्याची सूचना दिली होती. त्यानंतरही निकृष्ट दर्जाचे रॅपिंग किट वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बेजबाबदार हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.